
वसई-विरारमधील बेकायदा बांधकामप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दादा भुसे यांचे भाचे जावई अनिल कुमार पवार यांनी बिल्डरांकडून लाच स्वीकारण्यासाठी गँग तयार केली. इमारतींना परवानग्या देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कमिशन घेतले तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई टाळण्यासाठी मोठी लाच स्वीकारली असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने आज विशेष न्यायालयात केला.
वसई-विरार पालिकेच्या आयुक्त पदी असताना अनिलकुमार यांनी नालासोपारा येथील 60 एकर भूखंडाचे आरक्षण बदलले, त्या ठिकाणी 41 अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या. नगर रचना उप संचालक व्हाय. एस रेड्डी यांना हाताशी धरून अनधिकृत बांधकामाचे रेटकार्ड जारी केले. अनिलकुमार यांची बदली ठाणे येथे झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने छापेमारी करून कोटय़वधींची रक्कम व संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली. या टोळीत सामील असलेला माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व अरुण गुप्ता यालाही तपास यंत्रणेने ताब्यात घेतले या सर्वांना विशेष पीएमएलए कोर्टात रिमांडसाठी हजर केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी अनिलकुमारसह सर्व आरोपींना 20 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली.
ईडीचा दावा काय
n अनिलकुमार पवार 2022 मध्ये महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अभियंते, आर्किटेक्ट, सीए आणि संपर्ककर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक टोळी तयार केली.
n 41 इमारती अनधिकृत आहेत हे माहीत असूनही, विकासकांनी या इमारतींमधील खोल्या विकून खरेदीदारांना फसवले.