
>> डॉ. समिरा गुजर जोशी
16व्या शतकात रामायण कथा मराठीत संपूर्ण स्वरूपात पहिल्यांदा अवतरली ती `भावार्थ रामायण’ या ग्रंथाच्या माध्यमातून.जशी ज्ञानेश्वरांची भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, तसेच एकनाथी रामायण म्हणजे भावार्थ रामायण.
एकनाथ महाराजांनी आपल्या उतारवयात केलेला शेवटचा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण होय. हा ग्रंथ म्हणजे वाल्मीकी रामायणावरील प्राकृत टीका ग्रंथ आहे. या ग्रंथाची व्याप्ती फारच मोठी आहे. याची ओवी संख्याच 40 हजार आहे. ही टीका भावार्थ आहे म्हणजे भाव आणि अर्थ ह्या दोन्हीला न्याय देणारी आहे. वाल्मीकी रामायणाव्यतिरिक्त आनंद रामायण, योगवासिष्ठ अशा ग्रंथाचा आधार एकनाथ महाराजांनी घेतला आहे. आजही ह्या ग्रंथाचे पारायण अनेक ठिकाणी होते. शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी इतक्या प्रासादिक स्वरूपात हा ग्रंथ लिहिला आहे की ते जणू आपल्याशी बोलत आहेत असेच वाटत राहाते.
त्यांनी हा एवढा मोठा ग्रंथ लिहिण्याचे धाडस का केले हे सांगताना ते म्हणतात,
तू कैसा झालासी वक्ता, पुसाल माझी योग्यता ।
तेही मी सांगेन तत्वता, सावध श्रोता परिसावी ।।
ते म्हणतात, रामायणावर मराठीतून काही लिहिण्याची माझी काय पात्रता? माझे संस्कृतचे ज्ञान तरी किती?
(अर्थात हे बोलणे म्हणजे त्यांचा विनय हे लक्षात घ्यायला हवे.)
माझे अंगी मूर्खपण, माझे मी जाणे संपूर्ण।
न करी म्हणता रामायण, श्री राम आपण कथा पेरी।।
रामाने आपल्याला कसे भारून टाकले ह्याचे इतके रसाळ वर्णन ते करताना लिहितात-
करू जाता फुकट गोष्टी। त्या माजी राम कथा उठी।
रामे पुरविली पाठी। खेळली दृष्टी रामायणी।।
मी दुसऱया काही गोष्टी बोलू लागलो तरी आपसुकच पुन्हा रामायणाकडेच वळू लागलो.
मी निजलो असता जाण। राम थापटी आपण।
म्हणे उठली करी रामायण। तेथे मी कोण न करावया।
रामाने पिच्छा पुरवून लिहून घेतलेले हे रामायण. असे मोठे ग्रंथ त्या विषयाची अंतप्रेरणा झाल्याशिवाय घडत नाहीत हेच खरे. तो आत्माराम हे करवून घेतो. एकनाथ महाराजांनी वाल्मीकी रामायण सांगत असताना त्यात स्वतचे रंग भरले. खास करून त्यांनी रचलेली आध्यात्मिक रूपके फार सुंदर आहेत.
अहमात्मा तोचि दशरथ। उत्पत्तीसी मुख्य हेत।
दूर गेलिया श्रीरघुनाथ। निवर्तत अहमात्मा।
आता विवेक आणि निजविचारू। तैसे वसिष्ठ विश्वामित्र गुरु।
ज्यांपासोनी अति साचारु। शस्त्रास्त्रविद्या दृढ केली।
कौसल्या ते सुविद्या। सुमित्रा ते शुद्ध मेधा।
कैकयी ते अविद्या। मंथरा कुविद्या तीपासी।
कुविद्या क्षोभवून अविद्येसी। श्रीराम केला वनवासी।।
एकनाथ महाराजांनी त्यांच्या काळात प्रचलित असलेल्या कथांनीही रामायण सजवले आहे. नारद मुनींनी वाल्या कोळ्याला राम नाम घ्यायला सांगितले. त्याला ते घेता येईना, तर नारद मुनी म्हणाले, “मग तू मरा, मरा म्हण.”
या कथेचा संदर्भ देऊन एकनाथ महाराज लिहितात – “उफराटे राम ये अक्षरी। मरा मरा या उत्तरी। नारद वाल्मीका उपदेश करी। दो अक्षरी उद्धरिला।।
आणि मग ते मर्म सांगतात की-
नाम शुद्ध हो अथवा अशुद्ध। जो जपे तो पावन शुद्ध।
श्रीरामनाम जगद्वंद्य परमानंद हरिनामे।।
राम-सीतेच्या विवाहप्रसंगाचे त्यांनी केलेले वर्णन तर फारच बहारदार आहे. पंगत बसली आहे. स्वत श्रीराम जेवायला बसले आहेत तर ताटात डाव्या बाजूला वाढली जाणारी लोणची ती काय, पण तीही किती अर्थपूर्ण झाली आहेत बघा. लोणची वाढली अनेके। रंगली भक्ती प्रेमरंगे एके सलवणे सर्वांगे। स्वाद श्रीरंगे सेवावा।।
लोणची खारट असतात ना म्हणून त्यांना सलवणे – मिठासकट असा शब्द आला आहे. त्यांनी एकेका लोणच्याचा आस्वाद घेतला. कोणकोणती लोणची होती? तर –
अहं कडवट कुहिरी। सोहम लोणच्यात रंगली खारी।
वैराग्य भोकरे खारली सारी। त्याही माझारी मुक्त मिरवे।
– अहंकाराची कडवट कैरी, पण सोहमच्या खारात मुरल्यावर म्हणजेच परमेश्वराशी एकरूप झाल्यावर ती चविष्ट झाली. वैराग्याची भोकरे खारवली तरी म्हणजे संसारात मुरवली तरी स्वतची चव म्हणजेच मुक्ती सांभाळून आहेत. स्वबोध आलेसी आवळा। भोजने चवी अति आगळा। मुळीच्या मुळेसी रंगला। स्वये सेविला श्रीरामे।। असे आवळ्याच्या आणि मुळ्याच्या लोणच्याचेही कौतुक सांगितले आहे. ( हे माईन – मुळय़ाचे लोणचे असेल का?) संपूर्ण थाळीचे असे रसभरीत पण भक्तिरसपूर्ण वर्णन करून शेवटी म्हटले आहे – पहिल्या नवजणी वाढत्या। चवघी जणी पूर्ण कर्त्या। जे पंगती श्रीराम भोक्ता। तेथे अतृप्तता असेना।।
याआधी वाढायला आलेल्या नऊ जणी म्हणजे नवविधा भक्ती आणि जेवण पूर्ण करणाऱया चौघीजणी म्हणजे चार प्रकारच्या मुक्ती. असं हे सगळं वर्णन आध्यात्मिक रूपक आहे. ह्या अशा रसाळ शैलीत सांगितलेल्या रामायणाने आजही मराठी मनात घर केले आहे. जो वाचेल तो तृप्तीचा ढेकर देईल यात शंका नाही.
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)