
>> शशिकांत सावंत
इंग्रजी साहित्यक्षेत्रात बुकर पुरस्कारांना विशेष मान आहे. नुकतीच बुकर पुरस्कार नामांकनाची प्राथमिक यादी जाहीर झाली. या यादीत बुकर पुरस्कार प्राप्त किरण देसाई या अनिवासी भारतीय लेखिकेच्या पुस्तकाची निवड झाली तर अनुवादासाठीचा मॅन बुकर पुरस्कार बानु मुश्ताक यांना जाहीर झाला. बुकर पुरस्कारांत भारतीय लेखकांचा ठसा नोंद घेण्यासारखा आहे.
बुकर पारितोषिक, मॅन बुकर पारितोषिक आणि मॅन बुकर इंटरनॅशनल हे तीन शब्द अलीकडे अनेकदा ऐकू येतात, ज्याला बुकर पारितोषिक म्हणतात ते 1970 पासून चालू झाले. प्रसिद्ध समीक्षक किंवा आज समीक्षक म्हणून ओळखले जाणारे जॉन बर्जर जेव्हा कादंबरी लिहीत होते, तेव्हा त्यांच्या ‘जी’ या कादंबरीला पुरस्कार मिळाला. त्या काळात बुकरची एवढी हवा नव्हती, पण मुळातच साहित्यिक पारितोषिके कमी होती. नोबेल सोडले तर बुकरइतक्या मोठय़ा रकमेचे पारितोषिक नव्हते.
80 च्या दशकात बुकरचा थोडा बोलबाला झाला आणि 90 च्या दशकात तर बुकर मिळवणे ही लेखक मंडळींची महत्त्वाकांक्षा बनली. त्याला कारणेही तशीच आहेत. एक म्हणजे बुकरची रचना. ते केवळ पुस्तकाला पारितोषिक देत नसत, तर पाच कादंबऱयांना नॉमिनेट करत असत. साहजिकच या पाच कादंबऱयांची चर्चा व्हायची. शिवाय पारितोषिक मिळालेल्या कादंबरीची अधिकच! त्यामुळेच बुकर पारितोषिकाला महत्त्व प्राप्त झाले. बुकर हे केवळ इंग्रजीत लिहिलेल्या आणि दीर्घ लेखनाला म्हणजे कादंबरीलाच मिळत असे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते कितीही उत्कृष्ट असले तरी मार्क्वेझ, कुंदेरा यांना मिळाले नाही. याचे कारण त्यांच्या कादंबऱ्या अनुवादित इंग्रजीत आल्या. मूळ कादंबरी जर इंग्रजीत असेल तरच तो पुरस्कार मिळत असे. तरीही त्या काळात अनेक दिग्गज लेखकांना तो मिळाला. मग ‘अॅमस्टरडॅम’सारख्या कादंबरीला असेल किंवा सलमान रश्दीच्या ‘मिडनाइट चिल्ड्रन’ला असेल किंवा अरुंधती रॉयच्या कादंबरीला असेल. या पारितोषिकाची रक्कम तेव्हा मोठी होती, म्हणजे अरुंधती रॉयला जेव्हा पुरस्कार मिळाला, तेव्हा तो रुपयांच्या भाषेत सात लाख रुपयांचा पुरस्कार होता. त्या काळात ही नव्वदच्या दशकात खूप मोठी रक्कम होती.
खरे तर इंग्रजीत लेखन करणाऱ्या भारतीयांची मोठी परंपरा आहे. उदा. कुली लिहिणारे मुल्कराज आनंद किंवा आर. के. नारायण. परंतु या सगळ्या कादंबऱयांना कोणीतरी परदेशातल्यांनी रिकग्निशन दिल्यानंतरच त्यांची चर्चा झाली. अगदी टागोरांचे उदाहरण घ्या ना, ‘गीतांजली’ला डब्लू. बी. येट्सने डोक्यावर घेतल्यानंतर ‘गीतांजली’ वाचले गेले आणि टागोरांना नोबेल मिळाले, पण इंग्रजीत लेखन करणाऱ्या लेखकांचीच मांदियाळी नव्वदच्या दशकात तयार झाली. त्यात आघाडीवर होते अर्थात महाकादंबरी लिहिणारे ‘सुटेबल बॉय’ लिहिणारे विक्रम सेठ, परंतु त्यांची कादंबरी लोकप्रिय होती आणि अशांकडे समीक्षक जरा शंकेनेच बघतात. पण अमिताव घोष, अमित चौधरी, विक्रम चंद्रा असे अनेक लेखक नव्वदच्या दशकात होऊ लागले. सुजित सराफ आणि विक्रम चंद्रा यांच्या कादंबरी गुन्हेगारी जगतात दोन्ही खूप लोकप्रिय झाल्या, परंतु त्यांच्या वाटय़ाला पुरस्कार आले नाहीत. अनिता देसाई यांची ‘हल्लाबुल्ला इन द ऑर्किड’ हिलाही बुकर मिळालं. थोडक्यात जग आपल्या इंग्रजी लेखकांची दखल घेऊ लागलं.
आता 13 कादंबऱयांना नामांकन मिळाले आहे. मुख्य म्हणजे किरण देसाई यांना 19 वर्षांनंतर ‘लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी’ या कादंबरीबद्दल पुरस्कार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्या कादंबऱ्या अजूनही भारतीय बाजारात उपलब्ध नाहीत. परंतु त्यांचे लेखक आणि कादंबरीचा विषय हे पाहिलेत तर पूर्णत वेगळे जग या साहित्यातून समोर येते, असे दिसते. गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील कादंबऱयांचा बोलबाला वाढला आहे, परंतु त्या बुकरसाठी निवडल्या जाऊच शकत नाहीत असा नियम आहे. परंतु जोनाथन फ्रेन्झन, डेव्हिड फॉस्टर व्हॉलिस, जॉन अप डाइक यांसारखे मोठे लेखक त्यामुळे वंचित राहिले. बुकरची अनेक वैशिष्टय़े आहेत, एकतर बुकरची जी निवड समिती असते, ती छुपी नसते. लेखक-कादंबरीकार हेच बुकर समितीचे अध्यक्ष असतात. बुकर आणखी एक काम करते, ज्यामुळे लेखक मंडळींच्या कीर्तीला आणि आर्थिक स्थितीला हातभार लागतो, तो म्हणजे नॉमिनेट झालेल्या सगळ्यांच्या पुस्तकाची विशेष आवृत्ती छापण्यात येते.
नॉमिनेशनमध्ये लाँग लिस्ट आणि शॉर्ट लिस्ट असे दोन प्रकार आहेत. लाँग लिस्टमध्ये आता 13 पुस्तके आहेत, त्यातली काही निवडक पाच-सहा किंवा सात-आठ पुस्तकांची यादी शॉर्ट लिस्ट म्हणून सप्टेंबरमध्ये जाहीर होईल आणि नोव्हेंबरमध्ये तो पुरस्कार मिळेल. आतापर्यंत ज्या-ज्या कादंबऱ्यांना बुकर मिळाला आहे, त्यात बहुतेक अटींनुसार बुकर अवॉर्डच्या, त्या ओरिजनल इंग्रजीत लिहिलेले असाव्यात. पण मॅन बुकर इंटरनॅशनलमध्ये ही अट सैल करण्यात आली. त्यामुळे बानू मुश्ताक यांच्या 12 कथांच्या ‘हार्ट लॅम्प’ या कन्नड कथासंग्रहाला म्हणजे त्याच्या अनुवादाला पुरस्कार मिळाला. अर्थातच त्यामुळे त्यांच्या पुस्तकाची चर्चा पुरस्कार मिळाल्यापासून म्हणजेच मे महिन्यापासून चालू सुरू आहे., बानू मुश्ताक या प्रसिद्ध कार्यकर्त्या आहेत. गेल्या काही वर्षांत सामाजिक, राजकीय विषयांचे लेखन करणाऱ्या लेखकांकडे बुकर समितीचे अधिक लक्ष गेलेले आहे असे दिसते.
बुकरच्या पुरस्काराची अगदी सन 70 पासूनची कोणतीही यादी पाहिली तर एक मोठे वैशिष्ट्य आपल्याला दिसते, ते म्हणजे केवळ कादंबरीचा कन्टेन्ट नव्हे, तर शैली यालाही बुकरमध्ये खूपच महत्त्व आहे. उदा. ‘मिडनाइट चिल्ड्रन’ची शैली ही बरीचशी लॅटिन-अमेरिकी लेखकांप्रमाणे होती, ज्याला ‘मॅजिक रिअलिझम’ म्हणतात. म्हणजे वास्तव आणि कल्पित यांचे मिश्रण काही वेळा या कादंबरीत आले होते. जे ग्रॅबिअल गार्सिया मार्क्वेझच्या आणि अन्य लॅटिन अमेरिकी लेखकांमध्ये आढळते. अरुंधती रॉय यांची शैली तर पूर्णत भिन्न होती. ‘मिल्कमन’ या कादंबरीत एकाही पात्राचे नाव नाही. त्यांचं वर्णन विशेषणांनी करता, करण्यात येतं म्हणजे तो तिरकी टोपी घालणारा माणूस वगैरे.
अर्थात बुकरच्या लेखकांच्या शैलीवर, टीकाही झाली आहे. अरुंधती रॉय यांच्या कादंबरीचे वर्णन फारुख धोंडी या इंग्रजी लेखकाने ‘जगातील सर्वात मोठी लिहिलेली कॉपी’ असे केले आहे. म्हणजे जाहिरातीच्या कॉपीप्रमाणे ही कादंबरी लिहिली आहे, असे त्याचे मत होते. अर्थात कोणत्याही पारितोषिकाबाबत वाद-विवाद होतातच, परंतु लेखकांना स्थैर्य आणि कीर्ती मिळवून देण्यात बुकरचे 50 वर्षांहून अधिक काळापासून योगदान आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.
(लेखक साहित्यक्षेत्रात कार्यरत आहेत.)