
>> तुषार गायकवाड
प्राण्यांबद्दल दया ठेवणं ही मानवतेची खूण आहे. सर्व जिवांबद्दल समान दृष्टिकोन ठेवणं हीच खरी भक्ती आहे हा संतांचा संदेश आपण मानतो, परंतु आज सध्या चुकीच्या कायद्यांमुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या सार्वजनिक आरोग्यासाठी जीवघेणी ठरत आहे. याच कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने कठोर पवित्रा घेतल्याचे दिसून आले.
‘जिथे जिथे प्राणी, तिथे तिथे दया; परंतु मानवहित सर्वोपरि’ या उक्तीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतून सर्व भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवून निवारा केंद्रांमध्ये हलवण्याचे दिलेले आदेश सार्थ ठरतात. प्राण्यांबद्दल दया ठेवणं ही मानवतेची खूण आहे. संत ज्ञानेश्वरही सर्व जिवांबद्दल समान दृष्टिकोन ठेवणं हीच खरी भक्ती आहे असा संदेश देताना ‘सर्व जीवांमाजी समदृष्टी, तेचि भक्ती परम सृष्टी’ असे म्हणतात. याबबात दुमत असण्याचे कसलेही कारण नाही, परंतु चुकीच्या कायद्यांमुळे आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या आज भारतात सार्वजनिक आरोग्यासाठी जीवघेणी ठरत आहे. याच कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने कठोर पवित्रा घेतल्याचे दिसून आले. न्यायालयाने याची दखल दिल्लीतील पूठ कलान येथे सहा वर्षीय छवी शर्माचा भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात रेबीजमुळे झालेल्या मृत्यूनंतर घेतली.दिल्लीतील पूठ कलान परिसरात गतवर्षी 30 जून 2024 रोजी या मुलीवर पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हल्ला केला. हल्ल्यातून मुलगी बचावली मात्र तरीही तिला रेबीजचा संसर्ग झाला. रेबीजमुळे छवीचा 26 जुलै 2024 रोजी मृत्यू झाला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या दिल्ली आवृत्तीत प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची दखल घेत स्युमोटो रिट याचिका दाखल केली. या सुनावणीदरम्यान बाहेर आलेली माहिती धक्कादायक आहे. सन 2024 मध्ये भारतात 37 लाखांहून भारतीयांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
यापैकी सुमारे 5 लाख 20 हजार प्रकरणे 15 वर्षांखालील मुलांशी संबंधित आहेत. शिवाय 54 लोकांना रेबीजमुळे मृत्यू कवटाळावा लागला. यामधे ओडिशातील बोलंगीर येथे रेबीजग्रस्त कुत्र्याच्या चाव्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील पॅरा-अॅथलीट जोगेंद्र छत्रिया आणि हृषीकेश राणा यांचाही समावेश आहे. 2023 मध्ये वाघबकरी चहा कंपनीचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यापासून स्वतला वाचवण्याच्या प्रयत्नात ते पाय घसरून पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला आणि ब्रेन हॅमरेज झाले व यातच त्यांचा मृत्यू झाला होता. माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कारकुनाला भटक्या कुत्र्याने घेतलेल्या चाव्याचे प्रकरणही भरपूर चर्चिले गेले होते.
गत सहा वर्षांत देशभरात तब्बल 2 कोटी 78 लाख लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. यावरून या एकंदर प्रकाराची भयावहता दिसून येते. महाराष्ट्रातील ही आकडेवारी तब्बल 30 लाखांची आहे. 2021-2023 या तीन वर्षांत देशात सर्वाधिक भटक्या कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या. देशभरात उत्तर प्रदेश व तामीळनाडूनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2024 मधील सर्वेक्षणात सुमारे 91 हजार भटके कुत्रे, तर पुणे महानगरपालिकेच्या सन 2023 मधील माहितीत सुमारे 1.89 लाख भटके कुत्रे होते. यावरून या विषयाचे गांभीर्य स्पष्ट होत आहे.
पशुजन्म नियंत्रण अधिनियम, 2001 या कायद्यामुळे आजची भटक्या कुत्र्यांची समस्या सार्वजनिक आरोग्यास जीवघेणी ठरत आहे. प्राणीप्रेमी प्राण्यांच्या हक्कांवर भर देतात, परंतु मानवी सुरक्षिततेचा विचार करत नाहीत. परिणामी सामान्य नागरिक, विशेषत लहान मुले आणि वृद्ध यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरून हटवून निवारा केंद्रांमध्ये हलवण्याचे, तसेच निर्बीजीकरण आणि लसीकरणासाठी कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश देऊन योग्य पाऊल उचललं आहे. याशिवाय खंडपीठाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याची गरज व्यक्त करत पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
पेटा व भटक्या श्वानप्रेमी लोकांनी सामान्य लोकांच्या जिवाशी खेळू नये. मानवतेच्या नावाखाली भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणं किंवा त्यांचं संरक्षण करणं याला मर्यादा असावी. प्राण्यांचा जगण्याचा हक्क मान्य करताना मानवाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल देशव्यापी उपाययोजनांसाठी मार्गदर्शक ठरेल, ज्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या नियंत्रणात येऊन मानवी जीव वाचतील. खरेच भूतदया हे धर्माचे मूळ मानायला हवेच, परंतु मानवी जीव सुरक्षित ठेवणे हेदेखील धर्माचे कर्तव्यच मानायला हवे. अशी भूमिकाच आजच्या काळात रस्त्यावरून पायपीट करणाऱ्या सामान्यांच्या सुरक्षित वावरासाठी अधिक समर्पक ठरते.
पेटासारख्या स्वयंसेवी व अतिप्राणीप्रेमींची भूमिका नेहमीच एकतर्फी आणि कुत्र्यांच्या बाजूने असते. अशा प्राणीप्रेमींची भूमिका मानवतेच्या दृष्टिकोनातून चुकीची ठरते. स्वयंसेवी संस्थेची भूमिका तटस्थ असली पाहिजे. मात्र पेटा केवळ प्राणी हक्कांवर भर देते. मानवी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करते. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला आठ आठवडय़ांच्या आत सर्व भटक्या कुत्र्यांना रस्त्यांवरुन हटवून निवारा केंद्रांमध्ये हलवण्याचे आदेश दिले आहेत. कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरणासाठी पुरेशा कर्मचाऱयांची नियुक्ती करणे, या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करणे असे अधिकार दिले आहेत. ज्यामध्ये एफआयआर दाखल करणे आणि कोर्टाचा अवमान केल्याचा खटला चालवणे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एका आठवडय़ाच्या आत हेल्पलाइन सुरू करण्यास सांगितले आहे. जेणेकरून कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांची तत्काळ माहिती मिळू शकेल.
(लेखक सामाजिक व राजकीय विषयांचे अभ्यासक आहेत.)