कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन

कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असणाऱ्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन उद्या (दि. 17) सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सहाच्या दरम्यान कोल्हापूर विमानतळावर सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापुरात उत्साहात स्वागत

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्याचा योग तब्बल चाळीस वर्षांच्या लोकलढय़ानंतर आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्किट बेंचची ऐतिहासिक सुरुवात होत असून, उद्या रविवारी (दि. 17) दुपारी तीन वाजता भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते भाऊसिंगजी मार्गावरील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयासमोरील (सीपीआर) ऐतिहासिक इमारतीत सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एम. जे. कर्णिक उपस्थित राहणार आहेत. यानंतर उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा मेरी वेदर मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, मुंबई येथूनही वकील दाखल झाले आहेत. हॉटेल-मालक संघाकडून त्यांच्यासाठी खास सोय करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले. कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार डिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी त्यांचे प्रथम स्वागत केले. त्यानंतर खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आदींनी त्यांचे स्वागत केले. यानंतर सरन्यायाधीशांचा ताफा थेट राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाकडे रवाना झाला. छत्रपती ताराराणी चौकातही त्यांचे स्वागत करण्यात आले.

सरन्यायाधीशांचे छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात दाखल होताच, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सिद्धार्थनगर परिसरातील सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मृती स्मारकस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी
खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते.

सोमवारपासून सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, छत्रपती संभाजीनगर व गोवा या खंडपीठांनंतर राज्यात सोमवारपासून कोल्हापूर सर्किट बेंच येथे न्यायदानास सुरुवात होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांचा न्यायदानाच्या प्रक्रियेतील वेळ, पैसा, श्रम यामुळे कमी होणार आहे.