शनिशिंगणापूर, शिर्डीत लाखो भाविक

स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सलग सुट्टय़ा तसेच श्रावणातील चौथा शनिवारचा मुहूर्त साधत तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर भाविकांच्या प्रचंड गर्दीने आज गजबजून गेले. दर्शनासाठी सकाळपासूनच महाद्वारापासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
शनिमूर्तीच्या दर्शनासाठी चौथऱ्याजवळ भाविकांची वाढत्या गर्दीमुळे रेटारेटी, गोंधळ उडाल्याने काही प्रमाणात नियोजन कोलमडले होते. सायंकाळपर्यंत तीन लाखांहून अधिक भाविकांनी शनिदर्शनासाठी हजेरी लावली.

शनिमहाराजांची पहाटेची महाआरती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटेपासून शनी मंदिराकडे भाविकांचा ओघ सुरू होता. दरम्यान, पहाटे पाच ते सात या वेळेत भाविकांनी चौथऱ्यावर जाऊन शनिमहाराजांना जलाभिषेक करण्याची पर्वणी साधली. आज श्रावणाचा चौथा शनिवार असल्याने शनिशिंगणापुरात हजारो भाविक दाखल झाले. तेल अभिषेकासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. हजारो लिटर तिळाचे तेल शनिमहाराजांना अर्पण करण्यात आले. अभिषेक, होम हवन भवनात पूजापाठ करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावरून हजारो महिला-पुरुष, भाविक पायी येत असल्याने यात्रेचे स्वरूप निर्माण झाले. दिवसभर भाविकांची गर्दी असल्याने शनी मंदिर परिसरातील देवस्थान वाहनतळ व खासगी वाहनतळ वाहनांनी हाऊसफुल्ल झाले. शनी मंदिरला जोडून असणाऱ्या रस्त्यावर दानशूर भक्तांनी खिचडी, चहा, पाणी बॉटल भाविकांसाठी मोफत देण्यात येत होते.

आज श्रावणाचा चौथा शनिवारचा मुहूर्त साधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे यांनी आज सकाळी शनी दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठातील देवता अभिषेक करून शनी मूर्तीचे दर्शन घेतले. तसेच अभिनेत्री, खासदार कंगना राणावत यांनीही शनीचे दर्शन घेतले.