
तब्बल 13 वर्षांपासून प्रलंबित पडलेल्या चेक्स बाऊन्स प्रकरणात संगमनेर येथील एका व्यक्तीला अतिरिक्त मुख्य न्यायाधीश पी. व्ही. सूर्यवंशी यांनी कारावासाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास शिक्षेत वाढ होणार असल्याचे दिलेल्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे.
याबाबत आरोपी आशीष सुभाष वर्मा यांनी व्यवसायाकरिता 5 लाखांचे कर्ज श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनीकडून घेतले होते. कर्जपूर्तीचे हप्ते वेळेत गेले नाहीत, तर 7 जून 2012 रोजी 20 हजार 764 रुपयांचा दिलेला धनादेशही वटला नाही. कंपनीने 6 जुलै 2012 रोजी वर्मा यांना कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र, नोटीस मिळूनही वर्मा यांनी रक्कम परत केली नाही, त्यामुळे कंपनीने 18 ऑगस्ट 2012 रोजी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. संगमनेर येथील आशीष वर्मा यांना अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी पी. व्ही. सूर्यवंशी यांनी दोषी ठरवत 2 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने वर्मा यांना 30 दिवसांच्या आत फिर्यादी कंपनीला 20,764 रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही दिला आहे. सदरची रक्कम न भरल्यास त्यांना आणखीन कारावास भोगावा लागणार आहे. तब्बल 13 वर्षे चाललेल्या या खटल्याचा महत्त्वपूर्ण निकाल 14 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला आहे. याबाबत श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड या कंपनीने सदर प्रकरण दाखल केले होते.
फिर्यादी कंपनीने सादर केलेले सर्व दस्तावेज, पुरावे, अधिकार पत्र बाऊन्स झालेला धनादेश, बँक रिटर्न नोटीस आणि कर्ज करारनामा न्यायालयाने ग्राह्य धरले. आरोपी हे गृहीतके खोडून काढण्यात अपयशी ठरले. जवळपास 13 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, या हेतूने तसेच यासाठी कारावासाची शिक्षा आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. याकामी वकील विजय देवगिरे, वकील सुभाष गोर्डे आणि सुमया सय्यद यांनी साहाय्य केले.