महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवीन मतदार निर्माण केले, राहुल गांधी यांची टीका

देशात संघ आणि भाजप संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवे मतदार निर्माण केले असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.

बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हिंदुस्थानात संघ आणि भाजप संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप जिंकतात. महाराष्ट्रातील सर्व ओपिनियन पोल्समध्ये इंडिया आघाडीचा विजय होईल असे भाकीत होते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमचा विजय होतो. विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होतो. महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने एक कोटी नवे मतदार निर्माण केले, हे आम्ही शोधून काढले की असे राहुल गांधी म्हणाले.

तसेच त्यांची कटकारस्थानं अशी आहेत की बिहार विधानसभा निवडणुकीत नवे मतदार वाढवून चोरी करतील, पण बिहारची जनता हे होऊ देणार नाही. आधी देशाला माहित नव्हते की मतांची चोरी कशी होते, पण आम्ही पत्रकार परिषदेत दाखवून दिले की चोरी कशी होते. भाजप अब्जाधीशांसोबत सरकार चालवतं. तुमचे मत चोरले जाते आणि तुमचा सगळा पैसा 5 ते 6 अब्जाधीशांना दिला जातो. आम्ही लोकसभेत 50 टक्के आरक्षणाची भिंत तोडण्याची मागणी केली, पण भाजप आणि नरेंद्र मोदींनी दबावाखाली जात निहाय जनगणना करू असे म्हटले. पण ते ते योग्य प्रकारे करणार नाहीत. मात्र आम्ही सत्तेत आलो तर तसे करणार आणि मतांची चोरीही थांबवू असेही राहुल गांधी म्हणाले.