दोनदा मतदान झाल्याचा आरोप झाला पण पुरावेच दिले नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. पण अशा प्रकारचे कुठलेच पुरावे आमच्याकडे सादर झाले नाहीत असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतदारांना लक्ष्य केले जात आहे असा आरोपही निवडणूक आयोगाने केला.

आज निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. कुमार म्हणाले की, काही मतदारांनी दोनदा मतदान झाल्याचा आरोप केला आहे. जेव्हा आम्ही पुरावे मागितले तेव्हा कुठलेही पुरावे दिले गेले नाही. निवडणूक आयोग असो किंवा मतदार अशा खोट्या आरोपांना घाबरणार नाही.

तसेच जेव्हा निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या मतदारांना लक्ष्य करून राजकारण केले जात आहे, तेव्हा आज निवडणूक आयोग सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की तो निर्धास्तपणे खडकासारखा ठाम उभा आहे आणि पुढेही उभाच राहील. गरीब, श्रीमंत, ज्येष्ठ, महिला, युवक अशा सर्व घटकांतील आणि सर्व धर्मांतील मतदारांसोबत कोणताही भेदभाव न करता असेही कुमार म्हणाले.