42 वर्षांनंतर स्वप्नपूर्ती; कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ प्रदीर्घ लोकलढय़ाची आज स्वप्नपूर्ती झाली. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण आज सायंकाळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिलेच्या अनावरणाने मोठय़ा दिमाखात झाले.

संस्थानकाळापासून सुरू असलेल्या सीपीआर रुग्णालयासमोरील न्यायालयीन हेरिटेज वास्तूमध्ये या सर्किट बेंचची सुरुवात झाली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आदी उपस्थित होते.  उद्घाटनप्रसंगी सरन्यायाधीश  गवई हे न्यायालयाच्या प्रांगणात येताच त्यांना पोलीस दलाच्या वतीने ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. सर्किट बेंचचे उद्घाटन करून इमारत परिसराची पाहणी करून झालेल्या कामाबद्दल सरन्यायाधीश गवई यांनी कौतुक केले.

काय ती झाडी, काय तो डोंगरफलकबाजीवरून चिमटे

दीड वर्षांपूर्वी आपण कोल्हापुरात आलो असता, येथील वकिलांचे शिष्टमंडळ आपल्याला भेटले. त्यांच्या झालेल्या चर्चेवरून त्यावेळीकाय ते डोंगरकाय ती झाडी…. काय हॉटेल…’, असे डेंजर भाषण वकील विवेक घाटगे यांनी केल्याची आठवण करून देताना, सर्किट बेंचच्या निमित्ताने श्रेयवादासाठी लागलेल्या फलकबाजीत आपलेही पह्टो लावल्याचे निदर्शनास आणून देत सरन्यायाधीश गवई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मिश्किल चिमटे काढले.

न्याय हा पक्षकाराच्या दारी गेला पाहिजे

‘कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे आपण लवकरच खंडपीठात रूपांतर करणार आहोत. न्याय हा पक्षकाराच्या दारी गेला पाहिजे, या मताचे आपण आहोत’ असे सांगतानाच, ‘संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण सर्वोच्च पदावर पोहोचलो आहोत. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी राहिले. त्यामुळे कोल्हापुरातील या सर्किट बेंचच्या माध्यमातून त्यांच्या उपकारांची उतराई म्हणून आपला हा खारीचा वाटा आहे. सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च पदावर बसताना जो आनंद झाला, तोच आनंद कोल्हापूर सर्किट बेंचच्या निमित्ताने झाल्याची कृतज्ञतापूर्वक भावना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केली.