
स्वातंत्र्यदिन, शनिवार आणि रविवार अशा लागोपाठ आलेल्या तीन सुट्टय़ांमुळे कोकणात गेलेले चाकरमानी आणि पर्यटक परतीच्या मार्गाला लागल्याने आज मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली. माणगावाजवळ तर तब्बल चार किलोमीटरपर्यंत गाडय़ांच्या रांगा लागल्या. गाडय़ांचा वेग मंदावल्यामुळे पोलादपूर ते पळस्पे हे 155 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सात तासांचा वेळ लागल्याने प्रवाशांचा भरपावसातही घामटा निघाला.
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरणाचे काम तसेच वाहतुकीच्या योग्य नियोजनाचा अभाव याचा फटका आज कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमानी आणि पर्यटकांना सहन करावा लागला. माणगाव, इंदापूर परिसरात तब्बल 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या. हे चार किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना सुमारे दीड तास वेळ लागल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. चाकरमानी व पर्यटक रविवारी परतीच्या प्रवासाला निघतील व महामार्गावर वाहनांच्या वर्दळीत वाढ होणार असल्याची कल्पना प्रशासनाला होती. मात्र वाहतूककोंडी होणार नाही यासाठी योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.
सणासुदीला वाहतूक कोंडी
मागील 14 वर्षांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. माणगाव बायपासचे कामही रखडले आहे. ठिकठिकाणी मोऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. याचा मोठा फटका वाहनचालकांना बसत आहे. ही कामे अपूर्ण राहिल्याने सणासुदीच्या काळात या महामार्गावर वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतुकीमुळे स्थानिक रहिवासीही हैराण झाले आहेत.