
भाजप आमदार राम कदम यांना उच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहे. महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेपाचा त्यांच्यावर याचिकाकर्त्याने ठपका ठेवला आहे. याचा खुलासा त्यांनी प्रतिज्ञापत्रावर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पालिकेने घेतलेल्या निर्णयात आमदार कदम यांचा सहभाग होता हे अभियंत्याच्या नोंदींवरून स्पष्ट होते. त्यामुळे त्यांना या प्रकरणात प्रतिवादी केले जात आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही सुनावणी 26 ऑगस्ट 2025 पर्यंत तहकूब केली. वुडन बॉक्सेस कंपनीने ही याचिका केली आहे. त्यांच्याद्वारे विक्रोळी पश्चिमेला इमारतींचे बांधकाम होणार होते. त्यांचे तेथे साईट ऑफिस आहे. यावर कारवाईची नोटीस पालिकेने धाडली. या नोटीसला पंपनीने आव्हान दिले असता न्यायालयाने कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे.