
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात राजस्थानच्या एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या तिघा कर्मचाऱयांनी लुटल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अटकेची धमकी देत मारहाण करून प्रवाशाचे 30 हजार जबरीने घेण्यात आले. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहेत.
कमल सोनी (37) हा प्रवासी राजस्थानला जाण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आला. त्यावेळी एका खाकी गणवेशधारी पोलिसाने थांबवले व बॅग तपासली. बॅगेत 14 ग्रॅम सोन्याचा तुकडा आणि 31 हजार 900 रुपये आढळून आले. त्यामुळे त्या पोलिसाने त्यांच्या साथीदार अंमलदारासह त्याला एका बंद खोलीत नेऊन त्याला शिवीगाळ करत धमकावले आणि मारहाण करून त्याच्याकडील 30 हजार काढून घेतले आणि त्याला सोडून दिले. त्यानंतर कमल दुरांतो एक्स्प्रेसने राजस्थानला गेला. तिथे गेल्यावर त्याने रतनगड पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराविरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन तो मुंबई सेंट्रल पोलिसांकडे पाठविण्यात आला असून आता या प्रकरणाचा तपास रेल्वे गुन्हे पोलीस करीत आहेत.