
गेले चार दिवस मुसळधार पावसामुळे झोडपून काढले होते. आज सकाळी कोदवली आणि अर्जुना नद्यांना पूर आला. पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरले. राजापूरात पूर आल्याने एकच हाहाःकार उडाला आहे.
राजापूर नगर परिषदेने भोंगा वाजवून सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरताच व्यापाऱ्यांनी तात्काळ सामान हलविण्यास सुरूही केली. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १५८ मिमी पाऊस पडला. त्यामध्ये मंडणगड -147.75 मिमी,खेड – 172.14मिमी,दापोली – 181.85 मिमी,चिपळूण – 162.44 मिमी,गुहागर – 130.60 मिमी, संगमेश्वर – 138.08 मिमी,रत्नागिरी – 140.55 मिमी,लांजा – 166.50 मिमी आणि राजापूर – 184.12 मिमी पाऊस पडला.
पाच नद्यांचे रौद्ररूप
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा हाहाःकार सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोका पातळीवर वाहत होती.सकाळी नऊ वाजल्यानंतर पाणी पातळी कमी होऊन ती सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. चिपळूणातील वशिष्ठी नदी,संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी,लांजा तालुक्यातील काजळी नदी,राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळीवर वाहत आहेत.