
गुजरातमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काँग्रेस नेत्याला चाकूने भोसकून निर्दयपणे हत्या करण्यात आली. आणंद शहरात ही घटना घडली असून सकाळी फेरफटका मारायला गेलेल्या नेत्यावर गुन्हेगारांनी चाकूचे अनेक वार केले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही अज्ञात व्यक्तींनी काँग्रेसचे माजी नगरसेवक इक्बाल हुसेन मलिक (वय 50) यांची निर्दयपणे हत्या केली. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला तेव्हा बकरोल परिसरातील गोया तलावाजवळ ही घटना घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक काही अज्ञात व्यक्ती तेथे आले आणि धारदार शस्त्रांनी मलिक यांच्यावर हल्ला केला. चाकूचे वार थेट मान व पोटावर झाले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपअधीक्षक जे. एन. पांचाल यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी एवढ्या निर्दयपणे हल्ला केला की मलिक यांना वाचवण्याची कोणतीही संधीच मिळाली नाही. हल्ल्यानंतर आरोपी तेथून फरार झाले.
मलिक यांच्या भावाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. मात्र, हल्ल्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. नुकतेच आणंद नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला असून जुन्या नगरपालिकेची निवडून आलेली शाखा बरखास्त करण्यात आली होती. मलिक हे त्याच शाखेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक होते आणि स्थानिक राजकारणात सक्रिय होते.