आभाळमाया – सूर्याचे दक्षिण ‘मुख’!

>> वैश्विक

अवकाशात तळपणारा आपला जनक-तारा सूर्य आपल्याकडच्या प्राचीन शिल्पकलेत मूर्तीमध्ये साकारलेला दिसतो. जगप्रसिद्ध लोणार विवर-सरोवराजवळ असलेल्या, अप्रतिम कलाकृतींनी नटलेल्या दैत्यसुदन मंदिरात ‘सूर्यशिल्प’ आहे. तेथे सूर्यमुख आपल्याला पाहता येते. परंतु ही एक सुंदर कलाकृती. प्रत्यक्षात सूर्य एक धगधगता तारा आहे, तो ‘हिरण्यगर्भ’ आहे, अतितप्त आहे याची माहिती जगातील अनेक संस्कृतींना होतीच.

आधुनिक काळात, यानं जेव्हा अवकाशात भ्रमण करू लागली, त्यानंतर 1968 मध्ये चंद्र तर पादाक्रान्त झालाच, पण सूर्यसुद्धा फार दूर राहिला नाही. वास्तविक सूर्य-पृथ्वी अंतर 15 कोटी किलोमीटर इतकं. त्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोचायला प्रकाशवेगानेही सव्वाआठ मिनिटं लागतात. मात्र, अंतराळयुगाचा आरंभ झाल्यानंतर आपला निर्माणकर्ता जनकतारा आहे तरी कसा हे पाहण्याची, त्यातही त्याचं जवळून निरीक्षण करण्याची ओढ संशोधकांना लागली. अधिकाधिक संशोधनाच्या दृष्टीने ते आवश्यकच होतं.

सूर्याचं जवळून निरीक्षण करण्यासाठी पहिलं यान गेलं ते ‘पेकर सोलार प्रोब.’ ते 2018 मध्ये उडालं आणि हेलिओफिजिक्स म्हणजे सौरभौतिकीचा अभ्यास करण्याच्या हेतूने कामाला लागलं. त्याने सूर्याला सुमारे 7 लाख किलोमीटरवरून न्याहाळत परिक्रमा केली. सौरवाऱयातील इलेक्ट्रॉन्स, सूर्याचे जवळून फोटो, सूर्याचं विद्युत चुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) क्षेत्र इत्यादींचा अभ्यास सुरू केला. सात वर्षांचा कार्यकाळ ठरवलेल्या ‘पेकर’ यानाने उद्दिष्ट पूर्ण केलं असून 12 ऑगस्टला त्याची ठरलेली कार्यवेळ संपली. अजूनही ते पृथ्वीपासून सुमारे 16 कोटी 29 लाख किलोमीटर अंतरावरून सूर्याभोवती फिरत आहे. इंधन संपताच ते सूर्याच्या तप्तमान वायुगोलात विलीन होईल. ते आतापर्यंतचे सर्वात वेगवान अवकाशयान असून ते सूर्याभोवती ताशी 6 लाख 92 हजार किलोमीटर वेगाने फिरत आहे.

आता ‘सूर्यदर्शना’चा त्यापुढचा महत्त्वाचा अंतराळी टप्पा म्हणजे 10 फेब्रुवारी 2020 या दिवशी उडालेलं ‘सोलार ऑर्बिटर (किंवा ऑर्बायटर) हे यान युरोपीय स्पेस एजन्सी आणि नासा यांनी संयुक्तपणे बनवलेले आहे. सूर्याच्या आतील भागाचं अचूक मोजमाप घेऊन सौरवाऱयांचे तसेच सूर्याच्या आजवर न पाहिलेल्या धुवीय भागाचं निरीक्षण अशी कठीण कामं करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. पृथ्वीवरून जे सौर-निरीक्षण अशक्य असतं ते ‘सोलार ऑर्बिटर किंवा ‘सौर-परिक्रमक’ करणार आहे. त्याचा मुख्य उद्देश, सूर्य त्याच्या सौरगोलार्धाची निर्मिती आणि जतन कसं करतो किंवा त्यावर कसा ताबा ठेवतो ते जाणून घेण्याचा आहे.

या ‘ऑर्बिटर’चा कालावधी कमीत कमी सात वर्षांचा असून त्याला तीन वर्षांची मुदतवाढ मिळू शकते. त्यापैकी पाच वर्षं तर झालीच आहेत. 209 किलोग्रॅम वजनाचं हे यान सूर्याच्या संरचनेचं निरीक्षण नोंदवेल. ते सूर्याच्या जवळ जातं तेव्हा सूर्यापासून 4 कोटी 20 लाख किलोमीटरवर असतं. त्यावरचा ‘मल्टिएलेमेन्ट टेलिस्कोप ‘करोना’ किंवा सूर्याच्या प्रभामंडलाचं आलेखन करेल, तसेच ‘पोलॅरिमॅटिक आणि हेलिओसिस्मिक इमेजर’द्वारा सूर्याच्या ध्रुवीय भागांचं चित्रण करेल. त्यासाठी त्यावर शक्तीशाली अल्ट्राव्हायलेट चित्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे.

या ऑर्बिटरवर सोलर विन्ड प्लाझ्मा अॅनलायझर (स्वा) हे ब्रिटीश उपकरण असून त्याद्वारे सौरवाऱ्यातील आयन, इलेक्ट्रॉन्स त्यांची घनता आणि वेग तसेच तापमान याची नोंद होत राहील.

‘स्पेन’ या देशाने बनवलेल्या ‘एनर्जेटिक पार्टिकल डिटेक्टर’द्वारे एनर्जेटिक पार्टिकलचं मापन होईल. ब्रिटीश बनावटीच्या मॅग्नेटोमीटरमुळे सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राची बारकाईने नोंद होईल. ‘रेडियो ऍन्ड प्लाझ्मा वेव्हज्’या फ्रेंचांनी बनवलेल्या अद्वितीय उपकरणामुळे अनेक शक्तीवान सेन्सरद्वारे सूर्याचं ‘मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फिल्ड’ कसं आहे ते तपशीलवार समजेल. जर्मनीचा पोलॅटिमेट्रिक आणि हेलिओसिस्मिक चित्रण यंत्रणेद्वारे (इमेजर) सूर्याच्या पृष्ठभागाची, सौरकंपांची स्पष्ट नोंद होईल.

‘एक्स्ट्रिम अल्ट्राव्हायलेट इमेजर’ हे उपकरण बेल्जियमने तयार केलेलं असून, त्याचं काम सूर्याच्या वातावरणातील थर, सौर पृष्ठभाग आणि प्रभामंडल (करोना) यांच्यातील दुवा (लिंक) जाणून घेता येईल.

स्पेक्ट्रल इमेजिंग ऑफ द करोनल इन्व्हायर्नमेंट या फ्रेंच उपकरणाद्वारे सूर्याच्या प्रभामंडलाचा वर्णपट बारकाईने अभ्यासला जाईल. याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण उपकरण सूर्याचा समग्र धांडोळा घेण्यासाठी सज्ज आहेत. नुकताच ‘युरोपीय स्पेस एजन्सी’च्या सोलार ऑर्बिटरवरच्या पीएचआय ईयूएल आणि स्पाइससारख्या उपकरणांनी सूर्याचं सर्व बाजूंनी निरीक्षण करत माणसाची नजर कॅमेऱयाद्वारेही पोचली नव्हती त्या सौर-ध्रुवांचे फोटो घेतले असून, त्यातही विशेष आहे ती सूर्याच्या दक्षिण ध्रुवाची फोटोग्राफी.

हे यश खूपच मोठं आहे. सध्या, सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धाकडे (न चालताही) निघालेला भासतो. त्याचं आपल्या निरीक्षणातलं दक्षिणायन सुरू झालंय. मात्र ‘सोलर ऑर्बिटर’ने सूर्याच्या खऱयाखुऱ्या दक्षिण ध्रुवाचं दर्शनच नव्हे तर फोटोही घेतलेत. आपलं ‘आदित्य एल-1’ हे सौरयानही कार्यरत आहेच. त्यानेही सौरज्वाला ‘केर्नेल’चे फोटो घेतलेत. ही सर्व यानं चक्क सूर्याच्या अंतरंगावर ‘प्रकाश’ टाकणार आहेत!