
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबईच्या वतीने स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांना संगीत क्षेत्रातील सर्वोच्च ‘संगीत महामहोपाध्याय’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात भरतनाटय़म नृत्यांगना ‘पद्मविभूषण’ विदुषी सोनल मानसिंह यांची उपस्थिती होती.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय ही भारतीय शास्त्राrय संगीत परंपरेचे जतन आणि संवर्धन करणारी संस्था आहे. यंदा या संस्थेच्या स्थापनेचा 125 वर्षांचा प्रवास पूर्ण होत असताना संस्थापक गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त हा सोहळा पार पडला. नवी मुंबईत झालेल्या विशेष पदवीदान समारंभात देशाच्या विविध प्रांतांतील विद्यार्थी, कलाकार आणि रसिक जमले होते.
डॉ. भरत बलवल्ली हे केवळ गायक नाहीत; ते एका संगीतिक-आध्यात्मिक चळवळीचे प्रवर्तक आहेत. त्यांच्या गायकीत भारतीय रागांची आध्यात्मिक गूढता, श्रुतींचे वैदिक विज्ञान आणि स्वरांचा मंत्रोच्चार सामावलेला आहे. त्यांच्या अद्वितीय ग्रंथ रागोपनिषदमधून त्यांनी भारतीय रागदारी संगीतातील उपनिषदात्मक तत्त्वज्ञान जगासमोर मांडले.