कानाखाली मारल्याच्या रागातून विद्यार्थ्याने शाळेतील शिक्षकालाच गोळी घातली, टिफीनमधून आणली होती बंदूक

विद्यार्थीदशेत असताना मुलांच्या आयुष्यामध्ये आई-वडिलांच्या नंतर शिक्षकांची भुमिका महत्त्वाची असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना ओरडतात आणि गरज पडली तर मारतात सुद्धा. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना चांगल वळण लागावं यासाठी केल्या जातात. याच पद्धतीने उत्तराखंडमध्ये शिक्षकाने एका विद्यार्थ्याच्या कानाखाली मारली होती. हाच राग मनात ठेवून त्या विद्यार्थ्याने टीफीनमध्ये बंदूक आणली त्या शिक्षकावर गोळी झाडली. या घटनेमुळे सर्वच हादरून गेले असून सध्या शिक्षकावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील उधम सिंह जिल्ह्यातील गुरू नानक या खासगी शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकाचे नाव गगनदिप सिंह कोहली तर विद्यार्थ्याचे नाव समर्थ बाजवा असे आहे. गगनदिप सिंह कोहली हे भौतिकशास्त्राचे शिक्षक आहेत. त्यांनी याच आठवड्यामध्ये समर्थ बाजवा याच्या कानाखाली मारली होती. हाच राग मनात ठेवून बुधवारी (20 ऑगस्ट 2025) समर्थ बाजवा टिफीनमध्ये बंदूक घेऊन आला. सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा मधली सुट्टी झाली, तेव्हा गगनदिप सिंग कोहली हे वर्गातून बाहेर जायला निघाले. याच वेळी समर्थ बाजवाने टिफीनमधून बंदूक काढली आणि गगनदिप सिंह कोहली यांच्यावर गोळी झाडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने पोलिसांना दिला. शिक्षकाला गोळी मारताच विद्यार्थ्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु इतर शिक्षकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. या घटनेनंतर गगनदिप सिंह कोहली यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 109 अंतर्गत अल्पवयीन विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला आहे. NDTV ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.