Buldhana Crime – ताटात उष्ट अन्न ठेवलं अन् मुलातला हैवान जागा झाला, जन्मदात्याचे तुकडे करून नदीत फेकले

महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. ताटात उष्ट अन्न ठेवलं या शुल्लक कारणावरून संतापलेल्या मुलाने जन्मदात्या बापावर कुऱ्हाडने वार करत त्यांची हत्या केली. मुलाचा राग एवढ्यावर शांत झाला नाही. त्याने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि पोत्यात भरून ते पूर्ण नदीत फेकून दिले. या प्रकरणी आरोपीची पत्नीनेच पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात हे भयंकर हत्याकांड घडलं आहे. मृत पित्याचे नाव रामराव तेल्हारकर असून आरोपी मुलाचे नाव शिवाजी रामराव तेल्हारकर असे आहे. सदर घटना 13 ऑगस्ट रोजी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवन करत असताना रामराव तेल्हारकर यांनी मुलाला ‘तू काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस’ असं म्हणत हिनवलं. याचवेळी मुलाने ताटात उष्ट अन्न का ठेवलं म्हणून वाद घातला. हा वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या शिवाजीने वडिलांच्या गळ्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीने वार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते पोत्यात भरून पूर्णा नदीमध्ये फेकून दिले.

याप्रकरणी मृत रामरानव तेल्हारकर यांची सून आणि आरोपी शिवाजी रामराव तेल्हारकर याची पत्नी हिनेच पोलिसात धाव घेतली आणि आरोपी नवऱ्याविरोधात तक्रार दिली. 19 ऑगस्ट रोजी घटना उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.