पुठ्ठ्याच्या नको, खऱ्या चाव्या द्या! आदित्य ठाकरे यांची मागणी

वरळी बीडीडीवासीयांना चाव्या घेतल्यानंतर ट्रान्झिट कॅम्पमधील घरे 15 दिवसांत सोडण्याची सक्ती केली आहे आणि तसे हमीपत्र रहिवाशांकडून घेतले जाणार आहे. ती 15 दिवसांची आणि हमीपत्राची अट रद्द करावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केली.

आदित्य ठाकरे यांनी वरळी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वरळी बीडीडीच्या जागी उभारण्यात आलेल्या नव्या इमारतींमधील 556 रहिवाशांना चावी वाटपाचा कार्यक्रम नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, मात्र त्यावेळी कुणालाही खऱया चाव्या देण्यात आल्या नाहीत, 16 लोकांना पुठ्ठय़ाच्या चाव्या दिल्या गेल्या, 556 पैकी फक्त 26 लोकांनाच आतापर्यंत घरांच्या चाव्या मिळाल्या आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी समोर आणले. हे प्रशासकीय अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

वरळी बीडीडीवासियांचा गणपती नव्या घरात साजरा व्हावा अशी अपेक्षा होती, पण चाव्या घेण्यासाठी म्हाडाने कागदपत्रांचे सहा सेट आणि हमीपत्र मागितले आहे. कुठेही शिफ्टिंग करायची झाली तर एक महिन्याचा तरी वेळ मिळायला हवा. कारण गणपतीसाठी अनेक लोक गावी जातील. त्यानंतर पितृपक्ष सुरू होईल. अशा परिस्थितीत लोक इतक्या लवकर शिफ्टिंग कशी करू शकतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. म्हाडाकडून ताबापत्र दिले जातेय. त्यातही महिलांच्या नावावर घर असेल तर त्या नावांमध्ये घोळ दिसून येत आहेत. ज्यांनी गृहप्रवेश केलाय ते सांगताहेत की, अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झालेले नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱया रिफ्यूज एरियाची दारेही बंद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन लोकांच्या सुविधेप्रमाणे सर्व प्रक्रिया राबवावी अशी विनंती आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महापालिका निवडणुकीत दोन भावांची खरी ताकद बघाल

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालाबाबतही यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी आदित्य ठाकरे यांना विचारले. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरही ती निवडणूक जिंकता आली नसल्याबद्दल माध्यमांनी विचारले. त्यावर, बेस्टची निवडणूक हा ट्रायल बॉल होता. त्यामुळे तो तसा खेळण्यात आला. नियोजन थोडं पुढेमागे झाले, पण ती निवडणूक ठरावीक युनियनसाठी मर्यादित होती. जनतेचा, मुंबई व महाराष्ट्राचा कल काय आहे आणि दोन पक्ष व दोन भाऊ एकत्र येण्याची ताकद खरी ओव्हर सुरू होईल तेव्हा दिसेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर भाजपकडून जे सुरू आहे त्यामागे त्यांच्या मनात शिवसेनेची असलेली भीती दिसत असल्याचे ते म्हणाले. बेस्टचा निकाल काहीही लागला तरी बेस्टला संपवण्याचा प्रयत्न भाजप आणि महायुती सरकार करतेय हे मत शिवसेना परखडपणे मांडत राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.