
राज्यसभा सदस्या सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत भाजपा खासदार कंगना रणौत यांच्या निवासस्थानी चक्क संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावरून अजित पवार गटाने संघाची विचारसरणी स्वीकारली की काय, अशी टीका राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते हे मला मिनीट टू मिनीट माहिती नसतं, असे म्हणत पत्रकारांसमोर हात जोडले.
महायुतीमध्ये असूनही अजित पवार संघाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथील रेशीमबागेत जाणे त्यांनी टाळले होते. मात्र, त्यांची पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने मोठी चर्चा रंगली आहे. भाजप खासदार कंगणा रणौत यांच्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समितीचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याबाबतचा फोटो कंगणा रणौत यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुनेत्रा पवार दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वर्धा जिल्ह्याच्या दौऱयावर असलेल्या अजित पवार यांना पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांच्या संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल प्रश्न विचारला. यावर अजित पवार म्हणाले, ‘मी विचारतो, मला माहीत नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते हे मला मिनीट टू मिनीट माहिती नसते. आपण आताच विचारलेले आहे. मी आता विचारतो, का गं, कुठे गेली होती?’ असे सांगत पत्रकारांसमोर हात जोडले.
संघाच्या कार्यक्रमाची मला कल्पना नव्हती
या कार्यक्रमात मला स्नेहमिलनासाठी बोलावले होते. त्यामुळे मी तिथे गेले. तिथे संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम होत आहे याची मला कल्पना नव्हती, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
राजकारणात अशी दुटप्पी भूमिका नको – रोहित पवार
एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला चव्हाण साहेबांचे, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला तुमचे प्रतिनिधी जात असतील तर ही दुटप्पी भूमिका आहे आणि आज राजकारणात लोकांना अशी दुटप्पी भूमिका नकोय, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.