
घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीमुळे वाहनचालक तसेच नागरिक हैराण झाले असतानाच शहा सेनेचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणेकरांना गुजरातच्या पॉड टॅक्सीचे गाजर दाखवले आहे. या हवाई टॅक्सी प्रकल्पाचे सादरीकरण आज दुसऱ्यांदा पालिका मुख्यालयात करण्यात आले, पण हे सादरीकरण अधिकाऱ्यांच्या चक्क डोक्यावरून गेले आहे. ठाणेकरांना हवेत उडण्याचे स्वप्न शहा सेनेने दाखवले असले तरी प्रत्यक्षात ते साकारणार काय आणि घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीला खरोखर ‘ब्रेक’ बसेल का, असा एकच सवाल विचारला जात आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, अहमदाबाद आणि गुजरात या भागातील वाहतुकीसाठी घोडबंदरचा हा मार्ग महत्त्वाचा समजला जातो. मात्र या मागावरील दररोज होणारी वाहतूककोंडी वाहनचालकांची डोकेदुखी ठरली आहे. या मार्गावरून अवजड वाहनांसह स्थानिक रहिवाशांची वाहने जात असतात. या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी, मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने, मार्ग अरुंद झाल्याने वाहतूककोंडी होत आहे. त्यातच गायमुख रस्त्याची दुरवस्था आणि डोंगर भागातून वाहून येणारे पावसाचे पाणी यामुळे कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून ही कोंडी सोडविण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज बैठक घेतली.
सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत जड वाहनांना बंदी घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत जड मालवाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून हा नियम लागू करण्यात आला आहे. वाहतूक विभागाने अध्यादेश काढला आहे. जड वाहनांची वाहतूक भिवंडीमार्गे वळविण्यात आली असल्याने घोडबंदर मार्गावरील वाहनधारकांना थोडा दिलासा मिळेल असा विश्वास वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केला.