प्रभाग रचनेचे प्रारूप आज जाहीर होणार?

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा आराखडा महापालिकेच्या निवडणूक विभागाने राज्याच्या नगरविकास विभागाला सादर केला आहे. नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी तो आराखडा शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी किंवा शनिवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शासनाने प्रभाग रचनेचे आदेश दिले होते. त्यानुसार चार सदस्यीय प्रभाग प्रणाली राबविण्याचा निर्णय घेत, त्या अनुषंगाने महापालिकांना वेळापत्रकही देण्यात आले होते. महापालिकेने ११ जूनपासून प्रारूप प्रभाग रचना आराखड्याचे काम सुरू केले. गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन हद्द तपासणी व प्रगणक गटांनुसार विभाजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. महापालिकेने या आराखड्यानुसार ४२ प्रभागांची निर्मिती केली असून, त्यात तीन सदस्यीय तीन प्रभाग केल्याचा दावा सूत्रांनी केला. दरम्यान, महापालिकेने चार ऑगस्टला हा आराखडा आयोगाला सादर केला.

नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आराखड्याची प्राथमिक तपासणी केल्यानंतर तो अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने शुक्रवारी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. २८ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यावर सुनावणी होऊन नियोजित वेळापत्रकानुसार अंतिम रचना जाहीर होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

प्रारूप प्रभाग रचनेचे वेळापत्रक
(मुंबईसह, अ, ब आणि क वर्ग महापालिका) प्रारूप रचना प्रसिद्ध करणे, हरकती सूचना मागवणे: २२ ते २८ ऑगस्ट. हरकतींवरील सुनावणी : २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर. अंतिम रचना आयोगाला सादर करणे १६ ते २२ सप्टेंबर. अंतिम रचना प्रसिद्ध करणे : ३ ते ६ ऑक्टोबर.

इच्छुकांची घालमेल
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सुरू असलेला प्रारूप प्रभागांचा आराखडा जाहीर होण्याआधीच प्रभागांच्या हद्द रचना कशा पद्धतीने झाल्या आहेत, यासंबंधीची जोरदार चर्चा झाल्या. काही भागांतील प्रभाग कशा पद्धतीने तयार केले आहेत, याची जाहीररीत्या चर्चा सुरू होती. तर, यासाठी भाजपच्या त्रिकुटाच्या हस्तक्षेपाची चर्चादेखील जोरदार झाली. महाविकास आघाडीनेदेखील प्रभाग रचनेवर आरोप केले आहेत. प्रभाग रचना प्रत्यक्ष कशी असेल याची उत्सुकता इच्छुकांना आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची घालमेल संपणार की प्रभागातील बदलांमुळे टेन्शन वाढणार हे लवकरच समोर येणार आहे.