
राज्यात दोनदा भाजपचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस दोनवेळा मुख्यमंत्री झाले. पण, फडणवीस आणि अजितदादांच्या या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही. कर्जमाफीच्या आशेवर जगलो, पण सरकारने साथ दिली नाही. त्यामुळे आज आपल्याला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे सांगत नेवासा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याने विष पिऊन आपले आयुष्य संपवले. बाबासाहेब सरोदे असे त्या शेतकऱ्याचे नाव असून आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांनी यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे.
कर्जमाफीच्या आशेवर जगलो, पण सरकारने साथ दिली नाही! फडणवीस, अजितदादांचे नाव घेत अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले pic.twitter.com/aM8tHTm0fB
— Saamana Online (@SaamanaOnline) August 22, 2025
बाबसाहेब सरोदे यांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला फटकारले आहे. ”शेतकऱ्यांचा 7/12 कोरा… कोरा… कोरा… करण्याचं निवडणुकीत आश्वासन देऊन हे सरकार सत्तेवर आलं, पण आता कर्जमाफी हे नाव घ्यायलाही सरकारला कापरं भरतंय. दोन दिवसांपूर्वीच नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सरोदे यांनी सरकारचा बुरखा फाडणारा सविस्तर व्हिडिओ करून मृत्यूला कवटाळलं. राज्यात दररोज सरासरी 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. निवडणुकीच्या ‘योग्य वेळेची’ वाट पाहणार असाल तर तोपर्यंत 15 हजार शेतकरी आत्महत्या करतील, असं आम्ही ओरडून ओरडून सांगितलं तरी बहिऱ्याचं सोंग घेतलेल्या सरकारला हे ऐकू येत नाही. सरकारला एवढंच सांगतो, निवडणुकीचा जुगार जिंकण्यासाठी शेतकऱ्यांचा जीव डावावर लावण्याचा धंदा बंद करा, हे तुम्हाला परवडणार नाही”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.
मी मेल्यावर तरी कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत करा
या जगामध्ये जगायचं म्हटले तर पैशाशिवाय काहीच होत नाही. माझी एकच अपेक्षा आहे, जिवंतपणी जरी नाही काही मदत झाली मला तर मेल्यावर तरी माझ्या कुटुंबीयाला, माझ्यासारख्या कर्जबाजारी शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी, अशी मी कळकळीची विनंती करतो, असं सरोदे यांनी म्हटले आहे. या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही. ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रियलसाठी आहे. फडणवीस आणि अजितदादांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. म्हणून मला आज आत्महत्या करायची वेळ येत आहे.