अखेर गोविंदाच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज, फसवणुकीचा केला आरोप

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा त्याच्या पत्नीपासून वेगळा होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होत्या. तसेच गोविंदा एका तरुण अभिनेत्रीला देखील डेट करत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने त्याच्यावर फसवणूक, अमानूष वागणूक दिल्याचा आरोप करत वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे.

सुनीताने मे महिन्यातच वांद्र्याच्या न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर 25 मे रोजी गोविंदाला न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. जूनपासून या प्रकरणात सुनावणी सुरू झाली असून सुनीता या प्रत्येक सुनावणीला हजर राहिल्या होत्या मात्र गोविंदा हजर राहत नसल्याचे समजते.

मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरची चर्चा

गोविंदा याचे एका तरुण मराठी अभिनेत्रीसोबत अफेयर असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली आहे. हे अफेयर समोर आल्यानंतरच गोविंदा व सुनीताने वेगळे व्हायचा निर्णय घेतला होता. गेल्या काही महिन्यांपासून ते वेगळे राहत आहेत.