सांताक्रुझ यशवंतनगरमध्ये तुळजाभवानी मंदिर, हुबेहूब मंदिराची प्रतिकृती, खांबांवर आकर्षक कोरीवकाम आणि रोषणाई

गेल्या 40 वर्षांपासून हिंदू संस्कृतीची परंपरा आणि कला जपणाऱ्या सांताक्रुझच्या यशवंतनगरमध्ये गणेशोत्सवानिमित्त तुळजापूरमधील आई तुळजा भवानी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिराची ही भव्य प्रतिकृती पाहताना जणू आई भवानीच्या मंदिरातच आल्याचा भास होतो. मंदिर तब्बल 60 फूट लांब आणि 30 फूट रुंद आकाराचे असून मंदिरावर तब्बल 35 फुटांचा कळस उभारण्यात येत आहे.

यशवंतनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाकोला, शिवसेना शाखा क्रमांक 91चे यंदाचे 41वे वर्ष असून आई तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती उभारताना अनेक बारीकसारीक गोष्टी लक्षात घेण्यात आल्या आहेत. खांबावरील सुबक कोरीव आणि नक्षीकाम डोळ्यात चटकन भरेल असेच आहे. जोडीला आकर्षक रोषणाईदेखील आहे. हे मंदिर एकूण 20 खांबांवर उभे असून मुख्य गेट 50 फूट लांब तसेच 21 फुटाचा आहे. मुख्य प्रवेशद्वार पंडित नेहरू मार्ग ते गणपती मंडप या अर्धा किलोमीटर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराचा परिसरही आकर्षक दिव्यांनी उजळून निघतो आणि अतिशय प्रसन्न वातावरण निर्माण होते. शांतता, अध्यात्मभाव आणि प्रसन्नता गणेशभक्तांना अनुभवता येईल, असे मंडळाचे कार्याध्यक्ष आणि आमदार संजय पोतनीस यांनी सांगितले.

सामाजिक जागर आणि मनोरंजनही

मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक, आरोग्य शिबीर, मनोरंजनाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळाला आणि प्रोत्साहन मिळून चित्रकार घडावेत या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे मंडळाच्या वतीने सामाजिक जागर आणि मनोरंजनाचे कार्यक्रमही गणेशभक्तांसाठी आयोजित करण्यात आले आहेत.

  • मंडळाला गेली अनेक वर्षे मुंबईतील विविध गणेशोत्सव स्पर्धेत कलादिग्दर्शनाचे पारितोषिक मिळत आहे. मंदिराचे काम शागिर्द डेकोरेटर आणि कला दिर्गदर्शक सतीश मिश्रा यांनी मंडळाचे कार्याध्यक्ष, आमदार संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. शिवसेना शाखा क्रमांक 91चे सर्व शिवसैनिक आणि 50 कामगार गेल्या महिनाभरापासून अहोरात्र कष्ट घेत आहेत.