
आम्ही घुसखोरांना हिंदुस्थानात राहू देणार नाही, म्हणूनच सरकारने घुसखोरांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेससह काही राजकीय पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी घुसखोरीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. बिहार दौऱयानंतर मोदींनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येऔथे जैसोर रोड मेट्रो स्टेशनवरून नोआपारा जय हिंद विमानतळ मेट्रो सेवा, सियालदाह एस्प्लानेड मेट्रो सेवा आणि बेलेघाटा-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेवांना हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ते बोलत होते.
आता लवकरच तृणमूल काँग्रेसचे सरकार जाणार आणि भाजपचे सरकार येणार, घुसखोरांनाही देशातून पळून जावे लागेल, असे मोदी म्हणाले. मी लाल किल्ल्यावरून एक मोठी चिंता व्यक्त केली होती. ही चिंता घुसखोरीच्या वाढत्या धोक्याबद्दल आहे. कोलकाता आणि पश्चिम बंगालमधील लोक वेळेपूर्वी विचार करतात, म्हणून मी तुमच्यासोबत या मोठय़ा राष्ट्रीय आव्हानावर सतत चर्चा करत आहे, असेही मोदी म्हणाले. हे वर्ष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीचे आहे. भाजपचा जन्म डॉ. मुखर्जी यांच्या आशीर्वादाने झाला. डॉ. मुखर्जी हे हिंदुस्थानच्या औद्योगिक विकासाचे जनक आहेत. दुर्दैवाने काँग्रेसने याचे श्रेय त्यांना कधीच दिले नाही, असा आरोपही मोदींनी केला.