मुद्रा – सुवर्ण साकेत- ग्रंथ प्रकाशनाची 50 वर्षे

साकेत प्रकाशन हे महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रकाशनगृह. 15 ऑगस्ट रोजी या प्रकाशनगृहास 50 वर्षे पूर्ण झाली. प्रकाशन व्यवसायाची धुरा हाती घेणारे ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांचे साहित्यसंस्कृती क्षेत्रात अजोड योगदान आहे. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकाशन क्षेत्रातील साहित्य संवर्धनामागील दृष्टिकोन उलगडणारा त्यांचा लेख.

प्रकाशन म्हणजे ग्रंथव्यवहार. ग्रंथव्यवहारात सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य अंग अपेक्षित आहे. त्यामुळेच या व्यवहाराची इतर व्यवसायाशी तुलना करणे बरोबर नाही. ग्रंथव्यवहारात साहित्यसंवर्धनाचे काम असते. यात प्रकाशन करणे हे एक महत्त्वाचं काम आहे. प्रकाशनात ग्रंथ, त्याचा कर्ता म्हणजे लेखक, वाचक, वितरक, ग्रंथालय असे परस्पर संबंधाच्या घटकांची सोबत असते. प्रकाशकाने एक सामाजिक बांधिलकी अन् जबाबदारी समजून ग्रंथव्यवहार करावा असे अपेक्षित आहे.

लेखनकला हजारो वर्षांपासून विकसित होत गेली असली तरी मुद्रणयंत्राचा शोध पंधराव्या शतकात जर्मनीतील गुटेनबर्ग यांनी लावला आणि छापलेल्या ग्रंथव्यवहाराची सुरुवात झाली. त्यापूर्वीही चीनमध्ये लाकडी ठसे वापरून मुद्रण केले जात होते. पूर्वी एखादा ग्रंथ लिहून हाताने त्याच्या नकला केल्या जात असत, पण छपाई यंत्राने लेखनछपाईस गती आली.

हिंदुस्थानातही मुद्रणतंत्र आले. 1805 साली विल्यम कॅरी यांनी कोलकात्याजवळील श्रीरामपूर येथे ‘दी ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज’ पुस्तक छापून मराठी मुद्रित पुस्तकांचा श्रीगणेशा केला. मराठी प्रकाशनाची अशी दोन शतकांची परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषक मराठवाडा, हैदराबाद, विदर्भ सी.पी अन् बेरारमध्ये होते. पुस्तक प्रकाशनाचे मुख्य काम पुणे-मुंबई आणि बडोद्यातून मोठय़ा प्रमाणात झाले. बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सर्व मराठी भाषक लेखक-प्रकाशनास पुस्तक लेखनास आणि पुस्तक प्रकाशनास प्रोत्साहन दिले – मदत केली. बडोदा मदतीतून त्या काळात 7500 ग्रंथांचे प्रकाशन करून ते लेखक-प्रकाशकांचे पोशिंदे झाले.

भाषावर प्रांतरचनेनंतर मराठवाडा, विदर्भ हे संयुक्त महाराष्ट्राचे भाग बनले आणि मराठी प्रकाशन व्यवहारास अधिक गती आली. तरीही प्रकाशनाचे मुख्य काम पुणे-मुंबई या शहरातून होत होते. स्वातंत्र्यानंतर नव्यानं शिकलेला वर्ग वाचू लागला, लिहू लागला आणि या नव्या-जुन्या लेखकांना आणखी प्रकाशन संस्थांची गरज जाणवू लागली. चांगली पुस्तके छापणाऱयार प्रकाशकांना सर्वांची पुस्तक छपाई करणे अवघड जात होते. अशा परिस्थितीत संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, नांदेड, अंमळनेर, परभणी अशा ठिकाणाहून पुस्तक प्रकाशनाचे प्रयत्न सुरू झाले. काही लेखक स्वतःची पुस्तके स्वतः छापून प्रकाशन कोंडीवर उपाय शोधू लागले. आणि हळूहळू पुण्या-मुंबई या केंद्राबाहेर साहित्य संवर्धनाचे काम सुरू झाले.

महाराष्ट्र शासन पाठय़पुस्तकांच्या माध्यमातून, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळाच्या माध्यमातूनही ग्रंथ प्रकाशनाचे महत्त्वाचे काम करू लागले. ग्रंथालय चळवळींचा सर्वदूर प्रसार झाल्याने या ग्रंथालयांना दरवर्षी ग्रंथ खरेदीच्या निमित्ताने नव्या-जुन्या ग्रंथांची गरज भासू लागल्याने ग्रंथव्यवहारास आणखी गती आली. प्रकाशन हे सांस्कृतिक जबाबदारीचं काम असल्यामुळेच त्याची इतर व्यापार-व्यवहाराची तुलना प्रकाशनाशी करता येणार नाही. ग्राहकांना आपले प्रॉडक्ट आकर्षित करण्यासाठी विक्रीचे सगळे तंत्र अवलंबविणे हा यशस्वी व्यापाराचा पाया समजला जातो. त्यातून प्रतिस्पर्ध्यावर येनकेनप्रकारे कुरघोडी करावी लागते. व्यापार वाढविण्यासाठी डावपेच आखावे लागतात. एक प्रॉडक्ट कौशल्याने विकता येते.

प्रकाशनात मात्र प्रत्येक नवं पुस्तक हे लेखक-प्रकाशकाचं प्रॉडक्ट असतं. ती एक सर्जनशील निर्मिती असते. प्रकाशनात सातत्य ठेवण्यासाठी प्रकाशकास नव्या नव्या पुस्तकाचा, नव्या विषयाचा शोध घ्यावा लागतो. आलेले हस्तलिखित लेखकाशी चर्चा करत संपादकाच्या मदतीने संस्कारित करावे लागते. दुसरा टप्पा त्या ग्रंथाच्या उत्तम निर्मितीत मुद्रक, मुद्रितशोधक, मांडणी, कागद प्रकार, बांधणी, चित्रकार इतक्या घटकांच्या सहाय्याने एक प्रॉडक्ट तयार होते. हे तयार पुस्तक वाचक, ग्रंथालये अन् वितरकांपर्यंत जाणे हा अखेरचा टप्पा आहे.

मराठी प्रकाशन व्यवहाराची आणखी एक मर्यादा आहे. मराठीतील बहुतांश प्रकाशनगृह हे एकखांबी तंबूच आहेत. लेखकाकडून लिखाण मिळविणे, वाचून स्वीकारणे, त्यावर संपादकीय संस्कार करणे, मुद्रण करून विक्रीस पाठविणे ही कामं प्रकाशक करत असतो. याचा अर्थ लेखक, संपादक, मुद्रक-वितरकांकडे असलेली कौशल्ये आणि सेवा यांचे संयोजन एकटा प्रकाशक करून पुस्तक तयार करतो. त्यानंतर वृत्तपत्रातून प्रसिद्धी, विक्री ही कामेही तो करत असतो.

प्रत्येक नवे पुस्तक हे एक सर्जनशील निर्मिती असते आणि त्याचा मुख्य घटक असते प्रकाशन संस्था. मराठीत अलीकडे काही मान्यवर प्रकाशन संस्थांकडे स्वतंत्र संपादकीय विभाग, वितरण व्यवस्था ही व्यावसायिक टीम आहे; पण एकूण मराठी प्रकाशन व्यवहारामध्ये अशांची संख्या ही अत्यल्पच आहे. आणखी एक स्पष्ट बोलले पाहिजे. प्रत्येक व्यवसायाचे किमान नियम, सूत्रे आहेत. तो व्यवसाय निवडताना व्यवसायाचे कौशल्य हस्तगत करण्यासाठी शिक्षणाची मदत घेतली जाते. काही व्यवसायात पारंपरिक अनुभव शिक्षणाची पार्श्वभूमी असते; पण प्रकाशन व्यवहारात कोणीही प्रकाशक होऊ शकतो. प्रकाशन व्यवहारासाठी कोणताही अभ्यासक्रम अजून उपलब्ध नाही. तो होणे गरजेचे आहे. इतर प्रॉडक्टची पुस्तकाशी त्यामुळे तुलना करता येत नाही. दहा-अकरा कोटी मराठी वाचक असलेल्या महाराष्ट्रात उत्तम पुस्तकांना वाचकांकडून मिळत असलेला विक्रीचा अत्यल्प प्रतिसाद ही फार मोठी अभिमानाची गोष्ट नाही. आज जगात अनेक ठिकाणी साहित्य संस्कृतीच्या समृद्धीवरची श्रीमंती समजली जाते. या तुलनेत आपल्याकडील लेखन, प्रकाशन, वितरण या महत्त्वाच्या गोष्टीकडे जनसामान्यांचा कल तितकासा नाही हे वास्तव आहे. वाचन संस्कृती संवर्धन हे आपली जबाबदारी म्हणून प्रत्येकाने बघणं गरजेचं आहे. डिजिटलायझेशन झाले तरी ज्ञानव्यवहार आणि साहित्य व्यवहारासाठी पुस्तकाचा महत्त्वाचा पर्याय पूर्ण नामशेष होणार नाही. त्यामुळे बदल स्वीकारीत साहित्य संवर्धनाचे काम करणे आजची गरज आहे.

कोणत्याही समाजाचा सर्वांगीण विकास झाला आहे का? तो कसा झाला हे समजून घ्यायचे असेल तर त्या समाजाच्या भाषेत प्रकाशित झालेले साहित्य वाचायला हवे. मराठीतून प्रकाशित होणारे आजचे साहित्य हे मराठी माणसाची वैचारिक, आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक, राजकीय व्यावहारिक जडणघडण दर्शवते. मराठीतील साहित्य संवर्धन आणि प्रकाशन व्यवसाय हे मराठी समाजमनाचे प्रतिबिंबच आहे.

n [email protected]

 (लेखक साकेत प्रकाशनचे संस्थापक आहेत.)