
एमडी ड्रग्जची तस्करी करताना अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने रंगेहाथ पकडलेल्या एका सराईत गुन्हेगाराला न्यायालयाने जबर दणका दिला आहे. पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्या माफियाला 15 वर्षांचा कारावास व एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
वर्ष 2022 मध्ये वांद्रे युनिटने माहीम येथे समीर शब्बीर शेख ऊर्फ समीर पाणीपुरी (32) याला 110 ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जसह रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर सपोनि श्रीकांत कारकर यांनी गुह्याचा कसून सखोल तपास करत आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. दरम्यान, न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन पोलिसांनी पाणीपुरीविरोधात दिलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे त्याला 15 वर्षे कारावास व एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. पाणीपुरीविरोधात माहीम पोलीस ठाण्यात आठ गुह्यांची नोंद आहे.