पुन्हा पुन्हा मतदान करून लोक कंटाळतात, म्हणून वन नेशन वन इलेक्शन गरजेचे; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे विधान

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वन नेशन वन इलेक्शन देशासाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. गोयल म्हणाले की, लोक वारंवार मतदान करून कंटाळतात. जर ही व्यवस्था लागू झाली तर मतदारांचा सहभाग वाढेल, शासन अधिक प्रभावी होईल आणि खर्चातही बचत होईल असेही गोयल म्हणाले.

दिल्लीतील एका कार्यक्रमत गोयल म्हणाले की वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या वेळी निवडणुका झाल्यामुळे जनता आणि शासन दोघांवर ताण येतो. लोक मतदान करून थकतात, वारंवार मतदान केल्याने ते कंटाळतात असे गोयल म्हणाले.

तसेच जेव्हा आदर्श आचारसंहिता लागू होते तेव्हा प्रशासनिक कामकाज ठप्प होते. त्यांनी आंध्र प्रदेश आणि ओडिशाचे उदाहरण देत सांगितले की जिथे निवडणुका एकत्र घेतल्या जातात, तिथे मतदानाचा टक्का जास्त राहतो असेही गोयल म्हणाले.

गोयल यांनी जिल्हा स्तरापासून राज्य स्तरापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून Action Committees बनवण्याचे आवाहन केले. आपण प्रयत्न केला पाहिजे की जिल्हा ते राज्य स्तरापर्यंत संघटना मिळून एक अखिल भारतीय कृती समिती तयार करावी असेही गोयल यावेळी म्हणाले.