पालिका निवडणुकीत आपली मतं चोरली जाणार नाही याकडे लक्ष ठेवा, उद्धव ठाकरे यांचे आदेश

मतांचा पाऊस कसा पडेल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे. तसेच पालिका निवडणुकीत आपली मतं चोरी होणार नाही याकडे लक्ष ठेवा असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुंबईत एका शाखेला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, ही माझी शाखा भेट आहे. आणि तुम्ही माझी शाखा आहात. की माझी कौटुंबिक भेट आहे. मी फक्त शाखाभेटीसाठी आलो तर एवढी गर्दी झाली. जाहीर सभेला किती होईल. आपण दसऱ्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोत. त्यावेळेला मी बोलरणारेच. मी खासकरून या शाखेला भेट द्यायला आलोय. यानंतरही मी शाखांना भेटी देणार आहे. याचे कारण अनेक वेळेला शाखाप्रमुख असेल किंवा पदाधिकारी, हे मातोश्रीत येऊन मला भेटतात. पण कुटुंबाला भेटण्यासाठी मला या घरी यावं लागतं. आणि गेली दोन ते तीन वर्ष सतत प्रसारमाध्यमांमधून बातमी येते की इथून शिवसेनेला धक्का, तिथून शिवसेनेला धक्का. म्हटलं जाऊन बघुयाच असे किती धक्के दिले आणि असे धक्के देणारे अनेकजण आले आणि गेले. अनेकांनी धोके देण्याचे प्रयत्न केले आणि पुढेही होतील. पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे, तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील पण शिवसेना फुटणार नाही. तुम्ही सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहात, पण सगळ्यांनी एक काम करायचं आहे आपल्या वॉर्डात मतं चोरणारे घुसलेले आहेत का यावर लक्ष ठेवा. प्रत्येक गटप्रमुख आणि कार्यकर्त्याने गणपती आणि पितृपक्ष आहे. त्यानंतर नवरात्र असेल आणि पुढे निवडणूक होईल. आजपासूनच ऊत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा. घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही ते पहा, नाहीतर निवडणुकीच्या दिवशी जे लोक आपल्यात नाही त्यांच्या नावाने मतदान होतं तर काही ठिकाणी दुबार मतदान होतं. आता डोळ्यांमध्ये तेल घालून घरोघरी जाऊन मतदार यादी तपासून बघा. लोकसभेनंतर विधानसभेत जी मतंचोरी झाली. 40 ते 42 लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात घुसवले गेले, हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका. पाऊस पण पडतो आणि मतांचा पाऊस कसा पडेल यासाठी प्रयत्न करा असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.