पत्नीला जाळून मारणाऱ्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पायावर मारली गोळी

ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी पत्नी निक्कीला जाळून मारणाऱ्या पती विपिनची पोलिसांसोबत चकमक झाली. या चकमकीत आरोपी विपिनच्या पायाला गोळी लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विपीन पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, पण विपिन थांबला नाही. त्यानंतर पोलिसांनी गोळी झाडली जी विपिनच्या पायाला लागली.

रविवारी दुपारी पोलिस पथक आरोपीला तो थिनरची बाटली जिथून विकत आणला होता ती जप्त करण्यासाठी घेऊन जात होते. त्याच वेळी विपिनने पोलिसांची पिस्तूल हिसकावून घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर पोलिसांनी गोळी झाडली आणि ती त्याच्या पायाला लागली.

पोलिसांनी जे केलं ते योग्यचं केलं अशी प्रतिक्रिया निक्कीच्या वडिलांनी दिली. जो गुन्हेगार असतो तो पळून जाण्याचा प्रयत्न करतोच. विपिनही गुन्हेगार आहे. आमची विनंती आहे की पोलिसांनी इतरांनाही पकडावे आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पोलीस म्हणाले की, 21 ऑगस्ट रोजी माहिती मिळाली की एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने पत्नीला पेटवून मारले. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि तपास पुढे नेत मृत महिलेचा पती विपिनला अटक केली. आम्ही येथे ते ज्वलनशील द्रव्याच्या बाटल्या जप्त करण्यासाठी आलो होतो, ज्यांना त्याने आग लावल्यानंतर फेकून दिले होते. आम्ही त्या बाटल्या जप्त केल्या, पण त्याचदरम्यान त्याने इन्स्पेक्टरची पिस्तूल हिसकावली आणि पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला घेरले तेव्हा त्याने आमच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. आत्मरक्षणात पोलिसांनीही गोळी झाडली आणि ती त्याच्या पायाला लागली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आम्ही थिनरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत, ज्यांचा वापर निक्कीला जाळण्यासाठी करण्यात आला होता.