दिल्ली डायरी – अधिवेशन आणि सरकारचा दरारा पाण्यात…!

>> नीलेश कुलकर्णी

भाजपने व्होट चोरी केल्याचे परसेप्शन देशभरात तयार झाले आहे, पण संसदेत मात्र विरोधकांची भूमिका लवचिक नसल्यामुळे सरकारचे फावले. कोणत्याही चर्चेविना लोकसभेत बारा तर राज्यसभेत पंधरा महत्त्वाची विधेयके सरकारने मंजूर करून घेतली. हे अधिवेशन कामकाजाच्या दृष्टीने पाण्यात गेले असले तरी केंद्र सरकारचा दंभ व दरारादेखील याच अधिवेशनात वाहून गेला हे जास्त महत्त्वाचे आहे.

संसदेचे संपूर्ण पावसाळी अधिवेशन कामकाजाविना पाण्यात गेले! बिहारमधील मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीच्या (एसआयआर) निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दोन्ही सभागृहांत चर्चा व्हावी, अशी आग्रही मागणी विरोधकांनी शेवटपर्यंत लावून धरली. मात्र बनवाबनवी उघड होईल, या भीतीने सरकारने ती मान्य केली नाही. परिणामी संसदेतील पेच काही सुटू शकला नाही.

हॉलीवूडच्या थरारपटासारखे यावेळचे संसदेचे पावसाळी अधिवेशन ठरले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर रोज काही ना काही ‘हॅपनिंग’ होत राहिले. ऑपरेशन सिंदूरप्रकरणी संसदेत चर्चा झाली खरी, मात्र त्यात सरकारने आपलीच पाठ थोपटून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाषण करण्याची संधी लोकसभेत या चर्चेने दिली. मात्र राज्यसभेत त्यांनी भाषण का केले नाही? याची चर्चा अजूनही सुरूच आहे. निवडणूक आयोग हा केंद्रीय सत्तेच्या हुकुमाचा ताबेदार असल्याची टीका आजवर होत होती. मात्र राहुल गांधींनी थेट पुरावेच दाखवून आयोगापुढे ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल,’ अशी वेळ आणून ठेवली आहे. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी संसदेबाहेर कमालीचे यशस्वी झाले. मात्र संसदेत तसे घडले नाही. मुख्यमंत्री असोत की पंतप्रधान, तीस दिवसांचा तुरुंगवास झाल्यानंतर 31 व्या दिवशी त्यांना आपोआप पदावरून अपात्र ठरविण्याची तरतूद असणारे विधेयक गोंधळात मांडले गेले. हे विधेयक जेपीसीकडे गेले. मात्र तरीही सरकारने सभागृहातील गोंधळाचा अचूक फायदा उठवला असेच म्हणावे लागेल. लोकसभा व राज्यसभेत कोणत्याही चर्चेविना महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यात सरकार यशस्वी ठरले. विरोधक आपण अधिवेशन गाजवले, या आनंदात राहिले, तर सरकारने आपले हात धुऊन घेतले.

‘धाक’ संपला!

गेली अकरा वर्षे निरंकुश राजकीय सत्ता हाती असल्यामुळे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा या शस्त्रांचा बेमालूमपणे वापर करत अमित शहा यांची प्रतिमा राजकारणातले बाहुबली अशी तयार झाली होती. राजकीय विरोधकांना राजकारणाच्या मैदानात पराभूत करता येत नसेल तर त्यांना संपवून टाका, त्यासाठी तुरुंगात डांबा, त्यांचे मनोधैर्य खच्ची करा, असा फंडा अमित शहा यांनी अवलंबला होता. त्याचा भाजपच्या भक्तांनी चाणक्यनीती असा गवगवाही केला. मात्र या चाणक्यनीतीचा फुगा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात फुटला. वादग्रस्त घटनादुरुस्ती विधेयक मांडत असताना शहा यांच्या अंगावर कागदाच्या चिठोऱया फेकण्यात आल्या. त्यात समाजवादी पक्ष व तृणमूल काँग्रेसचे खासदार आघाडीवर होते. हे विधेयक मांडल्यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधकांच्या रुद्रावताराला घाबरून अमित शहा यांनी त्यांच्या पहिल्या रांगेतील आसनावरून भाषण करण्याऐवजी विरोधकांचे ‘हात’ पोहचणार नाहीत, अशा ‘सेफ’ चौथ्या रांगेतील आसनावरून भाषण केले. चिडलेले, भेदरलेले, घाबरलेले अमित शहा देशाने यावेळी पाहिले. कॉन्सिटय़ुशन क्लबच्या निवडणुकीतील पराभवाने पाठीवरची माती निघालेली नसताना लोकसभेत विरोधकांनी अमितभाईंची घाबरगुंडी उडवली. ‘पिछले ग्यारह साल से अमित शहा सबको डराते थे, अब अमित शहा सबसे डरने लगे है…’ हा या गोंधळानंतरचा कानावर पडलेला संवाद मोठा बोलका आहे. अमित शहा यांचा धाक संपला आहे. स्थायी असे काहीच नसते.

केजरीवालांच्या वाटेवर…

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका माथेफिरूने हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा निषेधच. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अशीच एका माथेफिरूने थप्पड मारली होती. याबाबतीत गुप्ता यांची केजरीवालांच्या वाटेवरून अप्रिय अशी वाटचाल झाली. मात्र ही वाटचाल एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ‘प्रत्यक्ष काम कमी, मात्र देखावा जास्त’ असे एक मॉडेल केजरीवालांनी दिल्लीत बेमालमूपणे अवलंबले होते. रेखा या केजरीवाल यांना वरताण ठरतील, अशी स्थिती आहे. केजरीवाल टॅम्पलेटच्या नुसार रेखा ग्प्तादेखील भरमसाट घोषणा व जाहिरातींवर राज्य कारभार चालवत आहेत. यमुना शुद्धीकरणाची घोषणा झाली. पुढे फक्त फोटोच झळकले; प्रत्यक्षात काम नाही. दिल्लीतील वायुप्रदूषणावरही नुसत्याच फुकाच्या बाता. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याची घोषणा झाली. प्रत्यक्षात नालेसफाई वरुणराजाच्या कृपेने झाली. दिल्लीच्या पावसात 110 जणांचा मृत्यू झाला. मात्र राजकीय चमकोगिरीत त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. महिला सन्मान निधीचा एक रुपयाही दिल्लीतील महिलांना मिळालेला नाही. मात्र प्रचार जोरात सुरू आहे. विविध चॅनेल्सवर मुलाखती, व्हिडीओ, रील्सवर दिल्लीच्या या ‘स्वयंघोषित भाग्यरेखा’ चमकत आहेत. दिल्लीत पाणीच पाणी चहूकडे अशी स्थिती झाल्यानंतरही त्या स्थितीत पावसाच्या साचलेल्या पाण्यात उभे राहून त्यांनी मुलाखती दिल्या. केजरीवालांनी शीशमहल बनवला तर रेखा यांनी आपल्या निवासस्थानाचा राजवाडा केला. अर्थात केजरीवाल अप्रिय व्हायला वेळ लागला. जनतेतून कोणीतरी हात टाकावा, ही वेळ केजरीवालांच्या आयुष्यात तशी उशिराच आली. रेखा गुप्तांच्या राजकीय आयुष्यात ती खूप लवकर आली. या हल्ल्याचे कोणत्याही पद्धतीने समर्थन करता येणार नाही. मात्र राजकारण्यांनी कामाच्या देखाव्याचे टॅम्पलेट लावून काम करू नये, इतकाच यामागचा धडा आहे.