
भुयारी मेट्रो मार्गिकेच्या वरळी ते कफ परेडपर्यंतच्या तिसऱ्या टप्प्याचे गणेशोत्सवातही उद्घाटन होण्याची शक्यता कमी आहे. सध्या मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे. संबंधित चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यानंतर मेट्रोची सेवा सुरू होणार असल्याने उद्घाटनाबाबत संभ्रम आहे.
सायन्स म्युझियम ते कफ परेडपर्यंतच्या टप्प्यातील मेट्रो स्थानकांचे 98.53 टक्के काम जुलैमध्येच पूर्ण झाले होते. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून प्रवासी सेवा सुरू केली जाण्याची चिन्हे होती. मात्र त्या अवधीत उर्वरित काम पूर्ण न झाल्याने ऑगस्टअखेरची डेडलाईन डोळय़ासमोर ठेवण्यात आली. मात्र आता सुरक्षा प्रमाणपत्र वेळेत मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याने भुयारी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन रेंगाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेगवान विकासाचा दिखावा करण्यासाठी महायुती सरकारने भुयारी मेट्रोच्या दोन टप्प्यांचे ‘वेगवान’ उद्घाटन केले. ती घाई पहिल्याच पावसाळ्यात सरकारच्या अंगलट आली. वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी साचल्याने सरकारच्या ‘वेगवान’ उद्घाटनावर जोरदार टीका झाली. त्या पार्श्वभूमीवर सरकारने भुयारी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाबाबत सावध भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे.