प्रभादेवीत वकिलाच्या घरी ‘आयकर’ची धाड

प्रभादेवीतील वकिलाच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला असून सर्च ऑपरेशन हाती घेतले आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे सर्च ऑपरेशन सुरू असून छापेमारीत लाखो रुपये आणि दागिने सापडल्याचे उघडकीस आले आहे.

प्रभादेवी येथील नीलेश हळदणकर हे पेशाने वकील आहेत. गेल्या काही वर्षांत हळदणकर यांनी प्रचंड मालमत्ता कमावल्याचा संशय असून  दादरसारख्या उच्चभू परिसरात त्यांनी अनेक फ्लॅट्स खरेदी केल्याची माहिती आहे. लाखोंचा व्यवहार रोखीने केल्याने आयकर विभागाच्या रडावर अ‍ॅड. नीलेश हळदणकर आले आहेत. आयकर विभागाची गेल्या सहा दिवसांपासून छापेमारी सुरू होती. नीलेश यांचे भाऊ वैभव सीए असून त्यांच्या चेंबूर येथील घरावरही आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. वैभव हळदणकर यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय आयकर विभागाला असून या छाप्यादरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातील सदस्यांचे फोन काढून घेतले होते.