भाजप नगरसेवकांनी नवी मुंबई पालिकेच्या उपायुक्तांना नाईकांच्या जनता दरबारात रडवले, ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी दबाव

खालापूर येथील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये गेलेल्या सहलीदरम्यान एका विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या ठेकेदाराचे बिल नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अडकून ठेवले आहे. हे बिल या निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराला देण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेवकांनी उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्यावर प्रचंड दबाव आणला आहे. याच ठेकेदाराची पाठराखण करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात खिल्लारे यांच्यावर जोरदार भडीमार केला. हा मानसिक छळ असह्य झाल्याने खिल्लारे यांना भरदरबारात रडू कोसळले.

नवी मुंबई महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सहल 26 फेब्रुवारी रोजी खालापूर येथील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये गेली होती. त्याचवेळी आयुष सिंग (14) या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सहलीचा आनंद लुटत असताना आयुषच्या अचानक छातीत दुखू लागले आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला नजीकच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले. या घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि ठेकेदारावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली. विद्यार्थ्यांच्या सहलीदरम्यान निष्काळजीपणा करणाऱ्या या ठेकेदाराचे बिल नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अडवून ठेवले आहे. हे बिल ठेकेदाराला देण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक महापालिकेच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्यावर दबाव आणत आहेत.

ठेकेदाराला घेऊन जनता दरबारात
वनमंत्री गणेश नाईक यांचा नुकताच वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार झाला. याच दरबारात भाजपचे माजी नगरसेवक या ठेकेदाराला घेऊन आले. भाजपचे नगरसेवक सर्वच स्तरांतून प्रचंड दबाव आणत असल्यामुळे उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांना नाईक यांच्यासमोरच रडू कोसळले. भाजपकडून या ठेकेदाराची पाठराखण होत असल्याने नवी मुंबईकरांमधून चिड व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हॉयरल
नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे या गणेश नाईक यांच्या जनता दरबारात नाईक यांच्या समोरच ढसाढसा रखडत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हॉयरल झाला आहे. यावर मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.