
उल्हासनगर पालिकेच्या नगररचना विभागात सध्या अधिकाऱ्यांच्या अदल्या-बदल्यांचा खेळ सुरू आहे. या विभागात गेल्या पाच महिन्यांत पाच सहाय्यक संचालक नगररचना अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र या गोंधळाने बांधकाम परवाना, अनधिकृत बांधकामे नियमितपणे करण्याची प्रक्रिया ठप्प पडल्या आहेत.
उल्हासनगर महानगरपालिका
सहाय्यक संचालक नगररचना ललित खोब्रागडे यांनी ऑनलाइन बांधकाम परवाने, अनधिकृत बांधकामे नियमितपणे करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना पदमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी भिवंडी महानगरपालिकेतील सहाय्यक संचालक नगररचना अजय साबळे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला. साबळे यांना जेमतेम पंधरा दिवस होत नाही तोच त्यांच्या जागी ठाणे पालिकेमधील सहाय्यक संचालक नगररचना राजेंद्र हेले यांना बसवण्यात आले. त्यांना हे पद देण्यात आले तेव्हा त्यांच्या सेवानिवृत्तीला अवघे सहा दिवस राहिले होते.
महसूल गोळा करण्याचे आव्हान
राजेंद्र हेले हे सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा भिवंडीचे अजय साबळे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला. आता पुन्हा साबळे यांना भिवंडीमध्ये पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी सं. ह. साकुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या अदला-बदलीच्या खेळात ललित खोब्रागडे हे पदमुक्त झाल्यापासून सहाय्यक संचालक नगररचना अधिकाऱ्यांच्या नावाची पाटी कोरी आहे. आता साकुरे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याने त्यांच्यासमोर बांधकाम परवाने, अनधिकृत बांधकामांना नियमितपणे करण्याच्या प्रक्रियेला गती देणे, पालिकेला अधिकाधिक महसूल वसूल करून देणे हे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान पालिकेतील या गोंधळामुळे नागरिकांची कामेच होत नसल्याने त्यांना माघारी परतावे लागत असल्याची खंत वास्तुविशारद अतुल देशमुख, अमर जग्यासी यांनी व्यक्त केली आहे.