छोटा मटकाचा जगण्यासाठी संघर्ष, पायाला झालीय गंभीर दुखापत

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला छोटा मटका नावाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलाय. महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर तो जखमी झाला. ब्रम्हा वाघाला त्याने ठार केले असले, तरी मटकासुद्धा त्यात गंभीर जखमी झालाय. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत तो शिकार कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला. परिणामी तो उपासमारीने मरू शकतो, हे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली जात आहे.

अशातच त्याने एका गुराची शिकार केली. हे चित्र आशादायी असले, तरी ही शिकार करताना त्याच्या पायाची जखम आणखीनच गंभीर झाली. आता तो जगण्यासाठी अक्षरशः संघर्ष करीत आहे. त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. डॉक्टर आणि विभागाची एक टीम या वाघावर सतत लक्ष ठेवून आहे. तज्ज्ञ आणि डॉक्टरांची टीम जो काही सल्ला देईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दुसरीकडे, या वाघाला वाचवण्यासाठी वनविभागाने प्रामाणिक प्रयत्न करावे, अशी वन्यजीवप्रेमींची मागणी आहे.