तुळशीवाडीचा महाराजा करणार पर्यावरण जनजागृती, पर्यावरणपूरक साहित्याने सजावट आणि टिश्यू पेपरने साकारली गणेश मूर्ती

ताडदेवच्या तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा पर्यावरण जनजागृती मोहीम आखण्यात येणार आहे. हा गणपती यंदा पर्यावरण मित्र गणेशा – तुळशीवाडीचा महाराजा असा आगळावेगळा संदेश तुळशीवाडीचा महाराजा घेऊन आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक मंडळांमध्येही इको फ्रेंडली मूर्तींचा ट्रेंड वाढत आहे. पेशवा आर्ट्सचे ख्यातनाम मूर्तिकार राजेश मयेकर यांनी टिश्यू पेपरपासून बाप्पाची मूर्ती साकारली असून ही गणेशमूर्ती विसर्जनासाठी पूर्णतः सुरक्षित आहे तसेच पर्यावरणपूरक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहे. मंडळाने सजावटही नैसर्गिक आणि पुनर्वापरयोग्य साहित्याच्या माध्यमातून केली आहे. परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासोबतच पाणी आणि ऊर्जेचा संयमी वापर करून पर्यावरण-जागरुकतेचा संदेश देण्यात आलेला आहे. दरम्यान, गणेशोत्सव हा केवळ पूजा नाही, तो समाजाला एकत्र आणून चांगुलपणासाठी काम करण्याच्या दृष्टीने उत्तम संधी आहे. परंपरेच्या सावलीत नवा विचार रुजवला, तरच भावी पिढी निसर्गाशी हातात हात घालून जगू शकेल, असा संदेश मंडळाने दिला आहे.   

दहा दिवस अन्नदानासह विविध शिबिरे

धार्मिक विधींव्यतिरिक्त मंडळाच्या वतीने दहा दिवस अखंड अन्नदान सेवा, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, अवयव दान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, महिला सक्षमीकरण कार्यशाळा आणि पर्यावरण जनजागृती मोहिमा अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.