संजय राऊत यांची मानहानी, नारायण राणे कोर्टात हजर; 11 सप्टेंबरपासून खटला चालणार

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात बजावण्यात आलेल्या समन्सनुसार भाजपचे खासदार नारायण राणे हे आज दंडाधिकारी न्यायालयात हजर राहिले. तुम्हाला गुन्हा मान्य आहे का, असा प्रश्न यावेळी दंडाधिकाऱ्यांनी केला, त्यावर ‘नाही’ इतकेच उत्तर राणे यांनी दिले. त्यामुळे राणेंविरोधात आता 11 सप्टेंबरपासून खटला चालणार आहे.

भांडुप येथे 15 जानेवारी 2023 रोजी कोकण महोत्सवात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्याविषयी तथ्यहीन आणि बदनामीकारक विधाने केली होती. ‘संजय राऊत यांना पहिल्यांदा मी खासदार बनवले, निवडणूक लढवण्यासाठी पैसे दिले. मतदार यादीत त्यांचे नाव नव्हते. तेही मी टाकायला लावले,’ अशी निराधार वक्तव्ये राणे यांनी केली होती. त्यावरून संजय राऊत यांनी अॅड. सार्थक शेट्टी यांच्या मार्फत माझगाव दंडाधिकारी न्यायालयात राणेंविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने याप्रकरणी 23 एप्रिल 2025 रोजी नारायण राणे यांना समन्स बजावले होते. दंडाधिकारी न्यायालयाच्या या समन्सला राणे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सत्र न्यायालयाने राणे यांचा अर्ज फेटाळून लावत दंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स कायम ठेवले होते.  

आज माझगाव न्यायालयात दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांच्या समोर नारायण राणे हजर झाले. यावेळी न्यायालयाने तुम्हाला गुन्हा मान्य आहे का, अशी विचारणा केली त्यावर राणेंनी ‘नाही’ असे उत्तर दिल्याने न्यायालयाने त्याची नोंद घेत पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी निश्चित केली.