शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार रहा, CDS अनिल चौहान यांचे सूचक विधान

सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी देशाच्या शत्रूंना कठोर संदेश देताना गर्जना केली की भारत जरी शांतिप्रिय देश असला तरी आपण ‘शांतिवादी’ नाही. त्यामुळे शत्रूंनी गैरसमज करून घेऊ नये. ह्याच कारणामुळे देशाची सेना युद्धासाठी नेहमी सज्ज असते, कारण शक्तीतूनच शांती येऊ शकते असे चौहान म्हणाले.

मंगळवारी (26 ऑगस्ट 2025) महू (इंदौर) येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित रण-संवाद कार्यक्रमात बोलताना जनरल चौहान म्हणाले की शक्तीशिवाय शांतता ही एक ‘युटोपियन’ कल्पना आहे. त्यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांची ओळ उद्धृत करताना सांगितले, “क्षमा शोभते त्या भुजंगाला ज्याच्याकडे विष असते; पण जो दंतहीन, विषरहित, विनम्र आणि साधा असेल त्याला क्षमा काय शोभणार?” चौहान म्हणाले की जर तुम्हाला शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार राहावे लागेल.

जनरल चौहान म्हणाले की रण संवादाचा उद्देश ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करणे नाही. कारण ऑपरेशन सिंदूरमधून जे धडे शिकायचे होते ते अमलात आणले जात आहेत. रण संवादामध्ये आपण ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर काय आहे, म्हणजेच ‘भविष्यातील युद्ध’ कसे असेल यावर चर्चा करत आहोत.

ते म्हणाले की भविष्यातील युद्ध अतिशय धोकादायक असेल आणि त्यात आपण केवळ एकत्रितपणे (सैन्य वायुदल आणि नौदल मिळून) विजय मिळवू शकतो. जनरल चौहान म्हणाले की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सक्षम आणि आत्मनिर्भर बनले पाहिजे.

यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘सुदर्शन चक्र मिशन’च्या घोषणेवर बोलताना सीडीएस म्हणाले की यावर काम सुरू झाले आहे. त्यांनी सांगितले की रविवारी DRDO कडून इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टम (IADWS) चे यशस्वी परीक्षण करण्यात आले, आणि हेच त्या उपक्रमाचा एक भाग आहे. सीडीएस म्हणाले की 2035 मध्ये जेव्हा हे मिशन पूर्ण होईल तेव्हा ते भारताच्या संरक्षणासाठी ‘आयरन डोम’ (किंवा ‘गोल्डन डोम’) सारखे कार्य करेल. त्यांनी सांगितले की भारत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने पुढे जात आहे आणि अशा परिस्थितीत भारताची सेना देखील जगातील प्रगत लष्करी दलांच्या श्रेणीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्नशील आहे.