शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्याविरुद्ध FIR, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

राजस्थानमधील भरतपूर येथे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही अभिनेत्यांवर सदोष वाहनांचे मार्केटिंग केल्याचा आरोप आहे. दोन्ही ब्रँड अ‍ॅम्बेसेडरसह, ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अन्सो किम, पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग आणि शोरूम मालकांचीही नावे एफआयआरमध्ये आहेत. भरतपूर येथील वकील कीर्ती सिंह यांच्या याचिकेवर न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील मथुरा गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कीर्ती सिंह यांनी एफआयआरमध्ये सांगितले आहे की, “मी जून २०२२ मध्ये २३ लाख ९७ हजार ३५३ रुपयांना कंपनीची कार खरेदी केली होती. मी ही कार मालवा ऑटो सेल्स प्रायव्हेट लिमिटेड कुंडली, सोनीपत (हरियाणा) येथून खरेदी केली होती.” त्यांनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकडून कारसाठी १०,०३,६९९ रुपयांचे कर्ज घेतले होते. उर्वरित रक्कम त्यांनी रोख दिली होती.

सिंह यांचा आरोप आहे की, हायवेवर ओव्हरटेक करताना कार पिकअप घेत नाही. ६-७ महिने गाडी चालवल्यानंतर, त्यात तांत्रिक बिघाड दिसू लागले. वेगाने चालवताना आवाज आणि कंपन होऊ लागले. याच समस्येला कंटाळून आता त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.