पोलीस डायरी – मुंबई ‘गर्दुले ‘मुक्त कधी होईल ? पोलिसांवरील वाढते हल्ले

>> प्रभाकर पवार

शनिवार 23 ऑगस्ट रोजी देवनार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक भालेराव व पोलीस शिपाई योगेश सूर्यवंशी यांच्यावर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या गर्दुल्यांनी गोवंडी येथे प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी अमली पदार्थांचे सेवन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांच्या गुन्हे आढावा बैठकीत अलीकडे दिले होते. या पार्श्वभूमीवर देवनार पोलिसांनी निर्जन ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात केली असता गोवंडी येथे काही जण अमली पदार्थाचे सेवन करताना देवनार पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातील काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. अशोक भालेराव व योगेश सूर्यवंशी यांच्यावर चाकूने वार केले. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गांजा, अफू, कोकेन आदी अमली पदार्थचि सेवन करणारे गर्दुले कोणत्याही घराला जातात हे वरील घटनेवरून लक्षात येते. बागबगीचा, उद्याने, मोकळी मैदाने, स्कायवॉक, खाडीजवळच्या झोपडपट्ट्या, रेल्वे, सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करणारे आपणास आढळून येतील. अशांवर पोलीस सहसा कारवाई करण्यासाठी धजत नाहीत. कारण पकडल्यानंतरही गर्दुले शांत बसत नाहीत. अमली पदार्थ न मिळाल्यावर वेडेपिसे झालेले गर्दुले पोलीस कोठडीतच पोलिसांवर हल्ले करतात. कोठडीतील ट्यूबलाईट फोडतात, आपली विष्ठा पोलिसांच्या अंगावर फेकतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला पोलीसच त्यांना गांजा पुरवून गप्प बसवतात. अशा गर्दुल्यांना एक वेळ पकडणे सोपे असते. परंतु त्यांना सांभाळणे, न्यायालयात हजर करणे हे पोलिसांसाठी मोठे दिव्य असते. तरीही सूर्यवंशी व भालेरावसारखे पोलीस अंमलदार आपला जीव धोक्यात घालून गर्दुल्यांना जेरबंद करतात हे कौतुकास्पद आहे.

मुंबई पोलीस गर्दुल्यांविरुद्ध वारंवार कारवाई करीत असतात, परंतु रेल्वे स्थानके तर गर्दुल्यांना आंदणच देण्यात आली आहेत. त्यामुळेच जयमाला आशर या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला आपले दोन पाय गमवावे लागले. मरीन लाईन्स येथे रेल्वे डब्यात घुसलेल्या एका गर्दुल्याने पर्समधील पैशासाठी जयमाला आशरला धावत्या रेल्वेच्या डब्यातून बाहेर फेकून दिले. त्यात तिचे दोन्ही पाय रेल्वे रुळाखाली आले आणि ती अपंग झाली. गर्दुले ही एक कीड आहे. गर्दुले आपली नशा भागविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याचे जयमाला आशर हे एक उदाहरण आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुर्दल्यांना न्यायालये जेलमध्ये पाठविते, परंतु तेथेही हे गर्दुले राडा करतात. जेलच्या शिपायांना, स्टाफला त्रास देतात. यावर शासन गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. अमली पदार्थांच्या अधीन गेलेल्यांना समुपदेशनाची (counselling) खरी गरज आहे. त्यांच्यासाठी वेगळे कारागृह हवे. यावर शासनाने विचार करायला हवा.

आपल्या देशात पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान आदी सीमा भागांतून अमली पदार्थ येतात व त्यांचे वाटप देशभरात होते. अगदी शाळा-कॉलेजांत अमली पदार्थांच्या पुड्या पोहोचविल्या जातात. शाळा-कॉलेजच्या आसपास पान टपऱ्यांजवळ एजंट वावरत असतात. सांकेतिक चिन्हे, खुणा व भाषांच्या माध्यमातून खरेदी-विक्री होते. बरेच विद्यार्थी या विळख्यात सापडले आहेत. काही जणांच्या दप्तरातच नशेच्या गोळ्या आढळून येत आहेत. ई-सिगारेट ओढण्याचेही शाळा-कॉलेजात प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांपेक्षा त्यांचे आईवडीलच तणावाखाली वावरत आहेत. ई-सिगारेटही आरोग्यासाठी हानीकारक आहे. ई-सिगारेटचे व्यसन वाढल्यास हृदयविकाराचा झटका कधीही येऊ शकतो, असे डॉक्टर सांगतात.

केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव घेणारी पोरं आज आयुष्यातून उठत आहेत. त्यांचे अभ्यास, खेळ किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात लक्ष लागत नाही. आरोग्य बिघडते, वजन कमी होते. निद्रानाश होतो. फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होतात. अमली पदार्थांच्या सेवनाने नशा व धुंदी येते. हे प्रमाण आपल्या देशातील शहरी भागात मोठ्या प्रमाणात जरी असले तरी याचे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मोटार अपघात होतात. त्यात अनेकांचे बळी जातात. अमली पदार्थांचे सेवन करणारे नैराश्यामुळे आत्महत्याही करतात. अमेरिकेत हे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी अमेरिकेत एक लाखापेक्षाही अधिक जण अमली पदार्थांच्या अतिसेवनाने मृत्यू पावतात. त्यात अल्पवयीन मुलांची संख्या लक्षणीय आहे. जसे गर्दुले पोलिसांवर हल्ले करतात तशी नशेच्या आहारी गेलेली पोरंही ‘ड्रग्ज’ मिळाले नाही तर आपल्या आईवडिलांवरही हल्ले करतात. घरात चोऱ्या करतात. पोलीस गर्दचा साठा मोठ्या प्रमाणात हस्तगत करतात. गर्दचे उत्पादन व वाहतूक करणाऱ्यांना पकडतात, परंतु कुणी व्यसनमुक्त झाले आहे का? शासनाच्या व्यसनमुक्त संघटना कुठे आहेत? स्वयंसेवी संघटनांना, पुनर्वसन केंद्रांना शासनाकडून पुरविण्यात येणारे अनुदान कुठे जाते? आपले जीवन हे सुंदर आहे. ते एकदाच मिळते. हे समजून सांगण्यासाठी आता जेलमध्येही समुपदेशन केंद्रे उभारली पाहिजेत, तरच पोलिसांवरील हल्ले कमी होतील. मुंबईसारखे शहर गर्दुलेमुक्त होईल. नाहीतर ‘पंजाब’मधील तरुण पोरं जशी डगच्या व्यसनापायी वाया गेली आहेत तशी मुंबईकर तरुणांची गत होईल एवढे लक्षात ठेवा.