मोनोरेल घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन, MMRDA कडून कारवाई

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामकाजातील त्रुटींमुळे निलंबित केले आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसात मोनोरेलच्या दोन गाड्या बंद पडल्या होत्या आणि त्यात काही प्रवासी अडकले होते.

मोनोरेल सेवा चालवणाऱ्या एमएमआरडीएने १९ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेबाबत उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

मायसूर कॉलनी आणि भक्ती पार्कदरम्यान अडकलेल्या मोनोरेलमधून 582 प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते. तर आणखी एका मोनोरेलमधील 200 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असले तरी या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एमएमआरडीएने प्राथमिक चौकशीत कार्यपद्धतीत त्रुटी आढळल्याने मुख्य अभियंता मनीष सोनी आणि व्यवस्थापक राजीव गीते यांना निलंबित केले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

“एमएमआरडीएचे आयुक्तांनी या घटनेत अवलंबलेल्या कार्यपद्धतींचा आढावा घेतला असता आणि प्राथमिक निष्कर्षांमध्ये कार्यप्रणालीत त्रुटी स्पष्ट झाल्याने या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे,” असे त्यांनी सांगितले.संपूर्ण आणि पारदर्शक चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आल्याचे असे अधिकाऱ्याने सांगितले.