
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेतील एक कडवं गायलं होतं. त्यामुळे एकच वाद झाला होता. अखेर शिवकुमार यांनी याबाबत माफी मागितली आहे.
बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजय सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवर भाजपने सुरु केलेल्या चर्चेत शिवकुमार यांनी भाजप नेत्यांची खिल्ली उडवण्यासाठी संघाच्या प्रार्थनेतील एक कडवं गायलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देताना पत्रकार परिषदेत शिवकुमार म्हणाले की, मी संघाचं कौतुक केलेलं नाही. विरोधकांविषयी जाणून घेणं ही माझी जबाबदारी आहे. मी विधानसभा सभागृहात संघाच्या प्रार्थनेतील काही ओळी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांची टिंगल करण्यासाठी गायल्या. मी फक्त अशोक यांना त्यांच्या पार्श्वभूमीबाबत माझ्या माहितीसंदर्भात सांगायचं होतं. पण काही जणांनी फक्त प्रार्थनेचा भाग वेगळा काढून त्याचा गैरवापर केला आणि जनतेत संभ्रम पसरवला असे शिवकुमार म्हणाले.
तसेच मी इंडिया आघाडीच्या नेत्यांची माफी मागेन, पण केवळ राजकारण करणाऱ्यांना मी घाबरत नाही. कुणालाही असा गैरसमज होऊ नये की मला जबरदस्तीने माफी मागायला भाग पाडलं. मी धमक्यांना घाबरणारा माणूस नाही असेही शिवकुमार म्हणाले.