
पुण्यात गेल्यावर्षी अवघ्या दोनशे मंडळाच्या आवारात प्रदूषण मंडळाने आवाजाची मोजणी केली आणि १२४ मंडळांवर गुन्हे दाखल केले. डीजेपुढे ही कारवाईची पुंगी फुसकी ठरणार नाही तर काय? डीजेची ही भिंत भेदण्यासाठी कठोर कारवाई आणि शालेय जीवनापासून प्रबोधन करण्याची गरज आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला डीजे विरोधात भूमिका घेणे अवघड जागेचे दुखणे आहे. कुणीही चकार शब्द काढणार नाहीत. समाजात भिनलेला डीजे एका रात्रीत शांत होणे कठीण आहे. इतर प्रदूषण रोखण्यात जसा लोकसहभाग वाढत आहे. तसाच लोकांचा दबाव वाढत गेला तरच डीजेमुक्त उत्सवाचा आनंद लुटता येईल. सुज्ञ नागरिकांनी यासाठी अंतर्मनातून येणारा आवाज ऐकायला हवा ! डीजेमुक्ती देगा देवा, अशी मनापासून गणराया चरणी प्रार्थना केली तरच उत्सवाची शान आणखी वाढेल!
श्रीगणरायाचे घरोघरी यथासांग पूजन करीत आनंदात आगमन झाले आहे. आपल्या लाडक्या बाप्पांचे कोडकौतुक करण्यात भाविक तल्लीन झाले आहेत. घरोघरी हे भक्तिमय वातावरण आहे तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना क्षणाचीही उसंत नाही. घरच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर सार्वजनिक बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता पाहता महासागराचे रूप धारण करेल. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि ढोलताशांच्या जल्लोषात झालेले आगमन याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी भाविक प्रचंड गर्दीने जमलेले होते. भक्तिरसाचा हा ऊर्जास्त्रोत पुढील दहा दिवसांत अखंडपणे वाहत राहील. उत्सवकाळात लहान-थोर सगळ्यांना गणरायाचे अनोखे रूप डोळ्यात साठवताना समाधानाची अनुभूती लाभते. महाराष्ट्रातील गावखेड्यात आणि मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये चैतन्यमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो. त्यामध्ये आता डीजे आणि लेझर लाईटचा होणारा वाढता वापर सगळ्यांच्याच चिंतेचे कारण ठरत आहे. लेझर लाईटमुळे धडधाकट माणसे दृष्टी गमावून बसतात, हे लक्षात येऊ लागल्यामुळे उत्सवात लेझर लाईट वापरणे कमी झाले. कोल्हापूरच्या मंडळींनी तर स्वतःहून लेझर लाईट बंदीचा निर्णय घेतला. परंतु डीजेची डोकेदुखी कमी होण्याऐवजी टिपेला चाललीय. जयंती असो की
कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम
असो हे फक्त निमित्त ठरते डीजे वाजवायचे. स्पीकर्सच्या भल्यामोठ्या भिंती ट्रॉलीजवर उभ्या करून रस्त्यावरून जाणारा हा कर्कशासूरच म्हणावा लागेल. गणेशोत्सवाच्या काळातही काही मंडळे डीजेच्या भिंती मिरवत असतात. ज्याचा डीजेचा आवाज मोठ्ठा ते मंडळ सरस अशी अहमहमिका लागलेली असते. विसर्जन मिरवणुकीत तर गणेश मंडळाचा सामान्य कार्यकर्ता डीजेच्या आवाजात बेधुंद झालेला असतो. पण वृद्ध, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींना त्या आवाजाने भयंकर त्रास होतो याचे भान कुणीच बाळगत नाही. बहिरे होणे, श्रवणशक्ती क्षीण होणे, हृदयविकाराचा झटका येणे, असे जीवघेणे परिणाम होऊ लागले तेव्हापासून डीजेविरोधात आवाज उठवणे सुरू झाले. परंतु विरोधाचा आवाज डीजे पुढे फारसा टिकू शकलेला नाही कारण मंडळाचे कार्यकर्ते हे राजकीय नेत्यांचे भरभक्कम पाठबळ असल्याने कार्यकर्त्यांना दुखावणे म्हणजे स्वतःचा बॅण्ड वाजवून घेणे हे नेतेमंडळी चांगलेच जाणून आहेत. डीजेमुक्त उत्सव ही दुधारी तलवार चालवून काहीही साध्य होणार नाही. आपल्या उत्सवप्रिय समाजाचे प्रबोधन करणे हाच मार्ग शांततेकडे जाणारा असेल. खरं तर सुसह्य मर्यादेपर्यंत स्पीकर्सचा आवाज आनंद देणारा असतो. मात्र त्यात बेभान, बेधुंद होण्याचा चस्का लागला की आवाजाचे सर्व बंध तोडून दणदणाट होऊ लागतो. उच्चभ्रू, श्रीमंतांच्या तरुणाईला बेधुंद व्हायला पंचतारांकित हॉटेलात कर्णकर्कश स्पीकर्सच्या आवाजात नाचण्याची सोय वर्षभर असते, गोरगरीब वस्तीतल्या पोरांनी असं बेभान व्हायला कुठे जायचं? त्यांनाही वर्षातून काही दिवस बेधुंद व्हायची संधी उत्सवात मिळते, असाही युक्तिवाद केला जातो. परंतु सार्वजनिक ठिकाणी
दणदणाट करणारे
डीजे नक्कीच लोकांचे स्वास्थ्य धोक्यात टाकणारे आहेत. डीजेवर निर्बंध घालण्यासाठी पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय हरित लवादाचे दरवाजे ठोठावले आहेत. उत्सवकाळात गणेश मंडळाच्या परिसरातील आवाजाचे मोजमाप करा. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करून त्यासंदर्भातील अहवाल उत्सव संपल्यानंतर चार आठवड्यांत सादर करा, असे फर्मान लवादाने पुणे पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला काढले. गेल्या वर्षी पेक्षा यंदा अधिक परिणामकारक आणि व्यापक पावले उचलण्यात यावीत, अशीही सूचना लवादाने केली. लवादाचे आदेश असले तरी डीजेच्या आवाजापुढे कारवाईचे इमले कसे थरथरतात हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. हजारो गणेश मंडळे असलेल्या पुण्यात गेल्यावर्षी अवघ्या दोनशे मंडळांच्या आवारात प्रदूषण मंडळाने आवाजाची मोजणी केली आणि १२४ मंडळांवर गुन्हे दाखल केले. डीजेपुढे ही कारवाईची पुंगी फुसकी ठरणार नाही तर काय? डीजेची ही भिंत भेदण्यासाठी कठोर कारवाई आणि शालेय जीवनापासून प्रबोधन करण्याची गरज आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला डीजे विरोधात भूमिका घेणे अवघड जागेचे दुखणे आहे. कुणीही चकार शब्द काढणार नाहीत. समाजात भिनलेला डीजे एका रात्रीत शांत होणे कठीण आहे. इतर प्रदूषण रोखण्यात जसा लोकसहभाग वाढत आहे. तसाच लोकांचा दबाव वाढत गेला तरच डीजेमुक्त उत्सवाचा आनंद लुटता येईल. सुज्ञ नागरिकांनी यासाठी अंतर्मनातून येणारा आवाज ऐकायला हवा ! डीजेमुक्ती देगा देवा, अशी मनापासुन गणराया चरणी प्रार्थना केली तरच उत्सवाची शान आणखी वाढेल!