एक्साइड इंडस्ट्रीजमधील संपादरम्यान कामगाराचा हृदयविकाराने मृत्यू, कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या मागणीसाठी चिंचवड येथील एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीतील कामगारांनी पुकारलेल्या बेमुदत संपादरम्यान मंगळवारी (२६ रोजी) एका कामगाराचा हृदयविकाराचा झटका बसून मृत्यू झाला. कंपनी व्यवस्थापनाचा हुकूमशाही कारभार आणि सततचा मानसिक त्रास यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप कंपनीतील कामगारांनी केला असून, कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाची धामधूम असतानाच कामगाराचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उद्योगनगरीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

विलास प्रल्हाद पोळ (वय ५५, रा. रहाटणी; मूळ रा. सासवड) असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. चिंचवड औद्योगिक परिसरात एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून सातत्याने कामगारांवर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ २५ ऑगस्ट २०२५ पासून एक्साइड कंपनीतील कामगारांनी व्यवस्थापनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर बेमुदत संप सुरू केला आहे. ३२ वर्षांपासून कंपनीत नोकरीला असलेले विलास पोळ हेसुद्धा या संपात सहभागी झाले होते.

संपात सहभागी झालेल्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने नोटीस बजावली. त्यामुळे सर्व कामगार तणावात होते. मंगळवारी (२६ रोजी) सकाळी पोळ संपात सहभागी झाले. दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे कामगारांनी तातडीने त्यांना लगतच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोळ यांच्या मृत्यूमुळे कामगारांमध्ये एकच संतापाची लाट उसळली. कंपनी व्यवस्थापनाचा हुकूमशाही कारभार आणि सततचा मानसिक त्रास यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करीत कामगारांनी पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कंपनी व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला.

श्रद्धांजलीही वाहू दिली नाही

शवविच्छेदनानंतर विलास पोळ यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. पोळ यांचे गाव पुरंदर तालुक्यातील सासवडजवळील परिंचे आहे. त्यांच्या मृतदेहावर गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कामगाराला अंत्यसंस्काराला जाणे शक्य होणार नाही, या उद्देशाने कामगारांनी पोळ यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर नेण्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली; परंतु पोलिसांनी ही परवानगी नाकारली. त्यामुळे कामगारांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पोळ यांचा मृतदेह गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला.