
मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत. 29 ऑगस्टपासून ते आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत. यासाठी त्यांनी मुंबईकडे कूच केली असून त्यांच्यासोबत मराठा समाजाचे हजारो लोक आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागातून मराठा लोक मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत. याच दरम्यान एका मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते रवाना झाले आहेत. हे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यासोबत जुन्नर येथे पोहोचल्यानंतर आंदोलनकर्ते सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरपगाव येथील रहिवासी होते.
प्राध्यापक जखमी
दरम्यान, केज येथील प्राध्यापक गणेश धपाटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या रॅलीत सहभागी झाले होते. त्यांना एका वाहनाने धडक दिलेली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मंचर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे.