
नांदेड, लातूर आणि बीड जिल्हय़ांवर आभाळच कोसळले! गुरुवारी रात्रीपासून अखंड कोसळणाऱ्या पावसाने नांदेड, लातुरकरांची दाणादाण उडवली असून, महापुराने वेढलेल्या या दोन्ही जिल्ह्यांत मदतीसाठी लष्कराला बोलावले आहे.
मुसळधार पावसाने नांदेड जिल्हय़ातील साडेपाच लाख तर बीड जिल्हय़ातील दोन लाख हेक्टरवरील पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. नांदेड जिल्ह्यात 69 मंडळांत ढगफुटी झाली असून, एकटय़ा माळाकोळी मंडळात 285 मिमी एवढा पाऊस झाला. 29 गावांमध्ये पुराचे पाणी घुसले असून, जवळपास पाच हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.मुसळधार पावसामुळे जिल्हय़ात तीन जणांचा मृत्यू झाला असून, मराठवाड्यातील रेल्वेसेवाही विस्कळीत झाली आहे. लातूर जिल्हय़ातही पावसाने धूमशान केले असून, 36 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्हय़ातील 66 मार्गांवरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही बंद होती. बीड जिल्हय़ात संततधार पावसाने दोन लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला. रात्रीतून झालेल्या पावसाने माजलगाव धरण 95 टक्के भरले आहे. परभणी, हिंगोलीतही पावसाने दाणादाण उडवली आहे. जायकवाडीसह मांजरा, तेरणा, इसापूर, विष्णुपुरी, येलदरी, सिद्धेश्वर, मानार आदी धरणांचे दरवाजे सताड उघडे ठेवण्यात आल्याने नदीकाठांवरील गावांना पुराने वेढले आहे.
लातुरमध्ये 36 मंडळांत दाणादाण
दोन दिवसांपासून लातूर जिल्हय़ावर आभाळच फाटले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने लातूरकरांची दाणादाण उडवली. 36 महसुली मंडळांत ढगफुटीच झाली आहे. मांजरा, तेरणाने रौद्ररूप धारण केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लष्करास मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. गेल्या 48 तासांपासून जिल्हय़ातील अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे. सर्वाधिक 152.4 मिमी चाकूर तालुक्यात तर सर्वात कमी 32 मिमी पाऊस औसा तालुक्यात झाला.