नागपूरमध्ये विद्यार्थिनीची निर्घृण हत्या; आरोपी फरार

नागपुरात एका विद्यार्थिनीवर चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलानेच तिची हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

नागपूरच्या सेंट अँथनी स्कूलमध्ये दहावीत शिकणारी एंजेल जॉन शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर बाहेर आली. याचवेळी इमामवाडा परिसरात राहणारा अल्पवयीन आरोपी तिच्या मागे आला. बोलण्याचे निमित्त करत अचानक त्याने एंजेलवर चाकूने हल्ला चढवला. शाळा परिसरात ओरड ऐकून विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक धावून आले. प्राचार्यांनी पोलिसांना माहिती दिली. गंभीर जखमी अवस्थेत एंजेलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिचा आधीच मृत झाल्याचे घोषित केले.

एंजेल आणि आरोपीची ओळख तीन वर्षांपासून होती. त्यांचे संबंध प्रेमात बदलले. परंतु गेल्या काही महिन्यांपासून आरोपीशी वाद झाल्याने एंजेलने बोलणे कमी केले. याचा राग मनात धरून आरोपीने तिचा जीव घेतल्याचा पोलिसांना संशय आहे.